जालना - डमी जोडपे पाठवून सदर बाजार पोलिसांनी शहरातील आझाद मैदान येथील एका कॉफी सेंटरमध्ये छापा टाकून आठ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आझाद मैदान येथील कॅफे थिकिंग कॉफी शॉपमध्ये सर्रासपणे तरुण-तरुणी आंबट चाळे करीत असल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी शनिवारी सदर ठिकाणी डमी जोडपे पाठविले. डमी जोडप्याने पाहणी केली असता, तेथे सर्रासपणे आंबट चाळे सुरू असल्याचे दिसून आले. या जोडप्याने पोलिसांना इशारा करताच, पोलिस निरीक्षक महाजन आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदर कॉपी शॉपमध्ये धाड टाकली. यावेळी चार जोडपी अश्लिल चाळे करताना आढळून आली. शिवाय, काऊंटरवर संशयित आकाश नारायण मोरे (२७, रा. धांडेगाव, ता. जालना), आशिष विष्णू आंबडकर (२३, रा. भिलपुरी, ता. जालना) हे दोघे मिळून आले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, ते येणाऱ्या जोडप्यांची कोणतीही माहिती आणि नोंद ठेवत नव्हते. शिवाय, जागेबाबत कॅफे चालविण्याच्या तसेच आतील भागामध्ये केलेल्या बदलाबाबत संबंधित विभागाची परवानगी नसल्याचे दिसून आले. कॅफेमध्ये सहा वेगवेगळ्या पध्दतीचे कम्पार्टमेंट करण्यात आल्याचे आढळले. त्याला लाकडासह कपड्याच्या पडद्याद्वारे आडोसा तयार करण्यात आला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोउपनि. दिपाली शिंदे, पोहेकॉ. रामप्रसाद रेंगे, जगनाथ जाधव, सोमनाथ उबाळे, भरत ढाकणे, प्रदीप कतारे यांनी केली आहे.
अर्ध्या तासासाठी घ्यायचे ५०० रुपयेकॉफी शॉप चालक तरुण-तरुणींकडून अर्ध्या तासासाठी ५०० रुपये घेत होते. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.