जालना - बचतगटाची वसुली करून दोन दुचाकींवरून निघालेल्या तीन तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून तीन लाख ५१ हजार ४६३ रुपये हिसकावून नेल्याची घटना गोंदी तांडा ते घुंगर्डे हदगाव रोडवर १६ ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ऋषीकेश रामेश्वर चौधरी (रा. चिकनगाव, अंबड) यांच्या फिर्यादीवरून संशयित चार जणांविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकशिंगे यांनी दिली.
ऋषीकेश रामेश्वर चौधरी हे बचत गटाचे फिल्ड असिस्टंट म्हणून काम करतात. १६ ऑगस्टला त्यांनी बचत गटांकडून पैसे आणले. त्यांच्यासोबत अन्य दोघेजण होते. या तिघांकडे जवळपास ३ लाख ५१ हजार ४६३ रुपये होते. पैसे घेऊन रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिघेही दोन दुचाकींनी गोंदी तांडा ते घुंगर्डे हादगाव रस्त्याने जात होते. घुंगर्डे हादगाव जवळ आल्यावर, कारमधून आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकी साईडला दाबल्या. त्यामुळे तिघेही खाली पडले. पिस्तूलचा धाक दाखवून चोरटे साडेतीन लाख रुपये हिसकावून घेऊन गेले. गुरुवारी रात्री ऋषीकेश रामेश्वर चौधरी यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच, गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकशिंगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.