जालना जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:14 AM2018-12-27T01:14:30+5:302018-12-27T01:14:45+5:30
बुधवारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे जालन्यात दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना हे एक मोठे व्यापारी केंद्र असल्याने येथे दररोज कोट्यवधी रूपयांचे बँकेचे व्यवहार होतात.मात्र बुधवारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे जालन्यात दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.
बँकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी संपाचा इशारा यापूर्वीच दिला होता. त्यानुसार बुधवारी बँका उघडल्या मात्र, तेथील व्यवहार ठप्प झाले होते. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएममध्ये खडखडाट होता. जालना जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या २८ पेक्षा अधिक शाखा आहेत. त्या सर्व शाखांमध्ये आज बंद पाळण्यात आला.
या राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपामुळे सहकारी बँका सुरू असून, कुठलाच उपयोग झाला नाही. सर्व बँकांचे आलेले धनादेश हे राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या जुन्या हैदराबाद बँकेत क्लिअरिंगसाठी पाठविले जातात. परंतु आजच्या संपामुळे क्लिअरिंगची व्यवस्थाच बंद असल्याने हे धनादेश सहकारी बँकेत तसेच पडून होते. सहकारी बँकेत केवळ रोखीने रक्कम स्वीकारण्याचे व्यवहार सुरळीत पार पडल्याची माहिती सहकारी बँकेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांनी सांगितले.
एकूणच सरकारने बँकांचे विलिनीकरण केल्यावर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्या तुलनेत बँकांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव असून, कंत्राटी पध्दतीने भरतीला प्राधान्य दिले जात आहे.
तसेच बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा करणे, बँक अधिकारी कर्मचा-यांना निवृत्तीवेतन योजना सुरू करणे यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आल्याचे बँक कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी देहेडकर यांनी सांगितले.