जालना जिल्ह्यात टँकरने केला पाचशेचा आकडा पार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:04 AM2019-05-09T00:04:40+5:302019-05-09T00:05:37+5:30
मे महिना उजाडल्यापासून टंचाईचे चटके अधिक तीव्र झाले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या मागणीचे प्रस्तावही त्याच गतीने धडकू लागले आहेत.
जालना : मे महिना उजाडल्यापासून टंचाईचे चटके अधिक तीव्र झाले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या मागणीचे प्रस्तावही त्याच गतीने धडकू लागले आहेत. आजघडीला टँकरने पाचशेंचा आकडा पार केला असून विहिर अधिग्रहणांची संख्या तर तब्बल सहाशेवर पोहोचली आहे.
मागील वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला. त्यामुळे लघु, मोठे आणि मध्यम प्रकल्प भरलेच नाहीत. त्यामुळे अनेक गावांना ऐन हिवाळ्यातच टंचाईचे चटके बसण्यास सुरूवात झाली. अशा गावांमध्ये आजघडीला अत्यंत भीषण स्थिती आहे. दरम्यान, सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ४२ अंश सेल्सिअसवर जावून ठेपला आहे. उन्हाच्या वाढलेल्या या तीव्रतेमुळे जलस्त्रोत झपाट्याने कारडे पडत आहेत. त्यामुळे दिवसागणिक टंचाईचे संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल होत आहेत. मात्र, आलेल्या प्रस्तावांना अपेक्षित गतीने मंजुरी दिली जात नाही, असा आरोप ग्रामपंचायतींकडून केला जात आहे.
आजघडीला जिल्ह्यातील ४४० गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ यापैकी ६८८ गावांसाठी विहीर, कुपनलिकांसारख्या स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ज्या गावांच्या परिसरात अधिग्रहण करण्यासाठीही स्त्रोत उपलब्ध नाहीत, तेथे टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे.
जिल्हाभरातील ४४० गावातील ९ लाख ७ हजार ४०६ नागरिकांची तहान ५१२ टँकर्सच्या पाण्यावर भागविली जात आहे़ सध्या जालना तालुक्यातील विरेगाव, रामनगर, नेर, सेवली, पाचलवडगाव, वाघरुळ, राममुर्ती, सोलगव्हाण, मौजपुरी, मिलपुरी, उटवद, मानेगाव खालसा, नागापुर, पिंपरी डुकरी, हडप, निपाणी पोखरी आदीं गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तर बदनापूर तालुक्यात रोषणगाव, दाभाडी, शेलगाव, बावणे पांगरी, बाजारवाहेगाव आदी, भोकरदन तालुक्यातील सिपोरा, केदारखेडा, आन्वा, हसनाबाद, पिंपळगाव रे. धावडा आदी. जाफराबाद तालुक्यातील माहोरा, वरुड.बु, टेंभुणी, कुंभारझरी आदी.
परतूर तालुक्यातील सातोना खु, श्रीष्टी, आष्टी, वाटुर, वाहेगावसातारा, पांडेपोखरी, टाकळी रंगोपंत, परतवाडी, खांडवी वाडी आदी,
मंठा व अंबड तालुक्यातीलही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हाभरातील ४४० गावांतील ९ लाख ७ हजार ४०६ ग्रामस्थांची तहान ५१२ टँकरच्या माध्यमातून भागविली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
दुर्लक्ष : जनावरांच्या पाण्याचा हिशेब नाही
दररोज प्रतिव्यक्ती २० लिटर याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या हिशेबाने लोकसंख्येच्या प्रमाणात तीन ते चार खेपा केल्या जातात. परंतु यामध्ये जनावरांसाठी पाण्याची तरतूद नसल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. छावण्या सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असली तरी अद्याप जिल्ह्यात कोठेही छावणी सुरू झालेली नाही.
जिल्हा प्रशासनाने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडाविण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे.