संजय लव्हाडे
जालना : जालना बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ नेहमीच्या तुलनेने कमी आहे. कृषी मंत्रालयांनी नाफेडला तुरीची सरकारी खरेदीला मान्यता दिल्याने तुरीत मंदी आली आहे. एकूणच, सर्व प्रकारच्या खाद्यतेलांमध्ये सटोरीयांची पकड मजबूत झाली आहे. खाद्यतेलांनी तेजीचा उच्चांक गाठला आहे. पाठोपाठ सोयाबीनच्या दरात तेजी कायम असून शेंगदानामध्ये तेजीचे सत्र सुरू असून, हरभऱ्याचे भाव मात्र हमीभावापेक्षा कमी झाले आहेत. सर्व प्रकारचा डाळीमध्येदेखील मंदी आहे.
कृषी मंत्रालयाने नाफेडला तूर खरेदीला मान्यता दिल्याने, तुरीच्या भावात येणारी मंदी आता थांबली आहे. जालना बाजारपेठेत तुरीची दररोजची आवक सहा हजार पोती इतकी असून त्यात १५० रुपये क्विंटलमागे वाढ झाल्याने तुरीचे दर पाच हजार ८०० ते पाच हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोयाबीनमध्येेही तेज कायम आहे. सोयाबीलना चीनमधून मोठी मागणी असल्याने हे दर वाढले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतातही तेल निर्मितीसह पशुखाद्यासाठी याची मोठी मागणी आहे. जालना बाजारपेठेत सोयाबीनची दररोजची आवक ही एक हजार पोती असल्याचे सांगण्यात आले. सोयाबीनचे दर चार हजार शंभर ते चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असे झाले आहेत.
सर्व प्रकारच्या खाद्यतेलांनी भावाचा उच्चांक गाठला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलांत सतत भाववाढ होत आहे. काय कारण आहेत, खाद्यतेलाचे एवढे दर वाढले असून, त्यावर सटोरीयांची पकड मजबूत असल्याने ही दरवाढ होत असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. सोया तेलाच्या वाढलेल्या दरामागे पामतेलाचे कारण जास्त आहे.
विश्वात पामतेल उत्पादक देशाहून स्वस्त निर्यात करून खरेदीदार देश मोठा नफा कमावत असल्याचे दिसते. मलेशियात यावर्षी पामचे उत्पादन कमी झाल्याने पाममध्ये तेजी राहणार आहे. सध्या तेलाला मोठी मागणी नसतानाही तेलाचे एवढे दर वाढले आहेत. भारतात आयात शुल्क दहा टक्केने कमी करूनसुध्दा भावात काही फरक पडला नाही. कारण, निर्यात करणाऱ्या देशांनी निर्यात शुल्क वाढविला आहे. खाद्यतेलाच्या बाजारावर सटोरीयाची मोठी पकड आजही कायम आहे.
सर्व प्रकारच्या खाद्यतेलामध्ये ५०० पेक्षा अधिक रुपये हे प्रतिबॅरल वाढले आहे. भविष्यात आणखी तेजीची शक्यता वर्तविली जात आहे. सोयाबीन तेलाचे भाव १२ हजार २०० , सरकी तेल ११ हजार ७००, पामतेल ११ हजार ३०० रुपये असे आहेत. हरभऱ्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले असून, आणखी नवीन हरभरा बाजारात आलेला नाही. शेंगदाना तेलाच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदानाचे दर आजघडीला ८ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. जालन्यातील बाजारपेठेत गुळाची रोजची आवक वाढली असून, पुढील महिन्यात मकरसंक्रांत असल्यने गुळाला मोठी मागणी राहणार आहे. चांगला गूळ आणि तीळाचे दर हे आगामी काही दिवसांत वाढतील, अशी आशा आहे.