कोरोनावर जनता कर्फ्यूचा वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:04 AM2020-03-23T00:04:56+5:302020-03-23T00:05:38+5:30
कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी जिल्हावासियांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जालना : ना पोलिसांचा लाठीमार... ना सायरनचा आवाज... ना रस्त्यावर उतरून दुकाने बंद करणारे नेते... असे काहीही नसताना केवळ कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी जिल्हावासियांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. रस्ते, मुख्य चौकांसह बाजारपेठेत शुकशुकाट होता. विविध भागांतील रस्त्यावर केवळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिसून आले. रविवारच्या बंदला मिळालेला प्रतिसाद पाहता शासन, प्रशासनाच्या प्रयत्नाला सर्वसामान्यांशी अशीच साथ राहिली तर कोरोना विषाणूवर मात करण्यात देश नक्की विजयी होईल, अशाच प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
कोरोना विषाणूचा चीन, इटली, स्पेनपाठोपाठ भारतातही शिरकाव झाला. सर्व प्रश्न बाजूला पडले आणि २४ तास केवळ कोरोना विषाणू आणि त्याचा फैलाव याचीच चर्चा सुरू झाली. मुुंबई, पुण्या पाठोपाठ जालना जिल्ह्यात १५ संशयितांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. पैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना विषाणूचा तिसऱ्या टप्प्यात प्रवेश होत असल्याने केंद्र शासनाने रविवारी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला होता. तत्पूर्वी शनिवारी जिल्हा बंदचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. शनिवारीही शहरातील सर्व व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. मोजक्या ठिकाणची सुरू असलेली बाजारपेठ आणि रस्त्यावर दिसणारी वाहने वगळता शनिवारचा दिवसाचा बंदही यशस्वी झाला.
जनता कर्फ्यूला मात्र जालना जिल्हावासियांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जनता कर्फ्यूमुळे सकाळी पासूनच नागरिकांनी घराबोर न पडणे पसंत केले. पहाटेच्या सुमारास वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेत्यांची लगबग दिसून आली. दिवसभरातील हालचालींवर नजर ठेवण्यासह परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा आरोरा यांच्यासह यंत्रणेने दिवसभर प्रयत्न केले.
कायदा- सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक असे १०० पोलीस अधिकारी व जवळपास १८०० वर कर्मचारी बंदोबस्त कामी तैनात होते. पोलिसांनी जालना येथे ड्रोन कॅमेºयाद्वारे पाहणी केली. जालना येथील जिल्हा रूग्णालयात कोरोना संशयितांसाठी रविवारी दुसरा स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला होता. पहिल्या कक्षात ८ तर दुसºया कक्षात ७ जणांवर रविवारी उपचार केले जात होते. दुपारपर्यंत ७ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. दिवसभरात विषारी द्रव प्राशन केलेले दोन रुग्ण आले होते. जिल्ह्यात १०८ च्या १५ रूग्णवाहिका असून, दोन आॅफरोड होत्या. तर इतर रुग्णवाहिकांनी रविवारी दिवसभरात जवळपास १३ कॉल घेऊन रूग्णांना रूग्णालयात नेले. यात अधिकतम प्रसुतीसाठी रुग्णालयात नेण्यात आलेल्या गरोदर मातांचा सहभाग होता.
२४ तास मशिनरींचा आवाज आणि वाहनांची ये-जा यामुळे जालना येथील एमआयडीसीमध्ये नेहमीच मोठी वर्दळ असते. परंतु, रविवारी जतना कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योजकांनी आपले उत्पादन बंद ठेवले होते. त्यामुळे एमआयडीसी देखील शहराप्रमाणेच शांत दिसून आली. कुठेही वाहनांची ये-जा अथवा कामाची लगबग नसल्याचे जालन्याच्या इतिहासात प्रथमच दिसून आले. दरम्यान, शहरी, ग्रामीण भागातील मुख्य चौक, रस्त्यांवर रविवारी शुकशुकाट होता. ठिकठिकाणी केवळ पोलीस अधिकारी, कर्मचारी दिसून आले. एकूणच कोरोनावर मात करण्यासाठी जालनेकरांनी जनता कर्फ्यूला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व नव्हे, ग्रेटच होता! यापुढेही उद्योजकांसह सर्वसामान्यांचे असेच सहकार्य राहणे आवश्यक आहे.
भोकरदन : भोकरदन शहरासह परिसरात ऐतिहासिक बंद पाळण्यात आला. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणेने बंदोबस्त ठेवला होता. शिवाय आरोग्य यंत्रणाही अलर्ट दिसून आली. नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिला.\
मंठा : शनिवारच्या बंदमध्ये मंठा शहर व तालुक्यातील व्यापाºयांनी प्रतिसाद नोंदविला. रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. मात्र, रविवारच्या जनता कर्फ्यूमध्ये शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांसह व्यापाºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवित कोरोनाशी लढा दिला.
परतूर : परतूर शहरासह परिसरातील नागरिकांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. मात्र, रेल्वे स्थानकावर रविवारी पहाटे उतरलेल्या प्रवाशांची तपासणी किंवा नोंदणी घेण्यासाठी पथक दिसून आले नाही. त्यामुळे हे प्रवासी कोठून आले आणि कोठे गेले, याची चर्चा सुरू होती.
बदनापूर : बदनापूर शहरातून गेलेल्या जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दिवसभर शुकशुकाट होता. तालुक्यातील ग्रामीण भागातही जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला. सलग दोन दिवस बंद पाळण्यात आल्याने बाजारपेठेतील लाखोंचे व्यवहार ठप्प झाले होते.
घनसावंगी : पोलीस यंत्रणा आरोग्य विभागासह इतर महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणेने रविवारी दिवसभर शहरासह तालुक्याचा आढावा घेतला. शहर, ग्रामीण भागातील नागरिकांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदविला. आरोग्य केंद्रात रूग्णांची तपासणी कली जात होती.
अंबड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर आरोग्य केंद्रांमधील अधिकारी, कर्मचारीही सज्ज होते.
जाफराबाद : शहरासह तालुकावासियांनी न भूतो न भविष्यती जनता कर्फ्यूची अनुभूती रविवारी घेतली. कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी नागरिकांनी दिवसभर घरात राहणेच पसंत केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अनेकांनी टाळ्या वाजविल्या.
चंदनझिरा : चंदनझिरा व्यावसायिकांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली होती. येथून जवळच असलेल्या एमआयडीसीतील सर्वच उद्योग बंद होते. त्यामुळे महामार्गावर नेहमी असलेली वर्दळ दिसून आली नाही. कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदविला.