जालना : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकरकाँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला रविवारी मुंबई ते जालना दरम्यान उधाण आले आहे. असे असले तरी खोतकरांकडून मात्र याबद्दल अद्याप कुठलाच निर्णय झाला नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहत आहे. त्यातच जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाही. भाजप शिवसेनेची युती झाल्यानंतर खोतकर यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ते काँग्रेस पक्षात जाणार, अशी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. रविवारी ही चर्चा अधिक गडदपणे समोर आली. यासंदर्भात काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपण मुंबईत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. परंतु अशोकराव म्हणाले की, २७ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे भेटून महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करु. खोतकरांच्या काँग्रेस प्रवेशाच्या हालचाली वेगात सुरु असल्याबद्दल विचारले असता गोरंट्याल म्हणाले की, स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता उमेदवार लादल्यास आम्हीही याबाबत विचार करु. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की, जोपर्यंत त्यांचा प्रवेश अधिकृतरीत्या होत नाही, तोपर्यंत यावर बोलणे उचित ठरणार नाही. मध्यंतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे मुंबई दौ-यावर गेले असता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची भेट वगळता अन्य वरिष्ठ पदाधिका-यांशी त्यांची भेट झाली नाही. असे असले तरी खोतकर यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल शिवसेनेकडून खंडनही केले जात नाही. खोतकर हे रविवारी सायंकाळी नाशिकला एका विवाह समारंभात होते. तेथे भ्रमणध्वनीवर स्पष्टपणे काही सांगण्याचे त्यांनी टाळले.
खोतकर काँग्रेसच्या वाटेवर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:25 AM