कापूस वेचणीसाठी विदर्भातील मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 01:02 AM2019-11-28T01:02:25+5:302019-11-28T01:02:44+5:30
भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी विदर्भातील मजुरांना कापूस वेचणीसाठी बोलाविले जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी विदर्भातील मजुरांना कापूस वेचणीसाठी बोलाविले जात आहे. मात्र, सहा रूपये किलोने वेचणी आणि वाहनाचे भाडे शेतकऱ्यांच्या माथी पडत आहे.
भोकरदन तालुक्यात जवळपास ४२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. साधारणत: दस-यानंतर शेतक-यांच्या घरी कापूस येण्यास सुरूवात होते. त्यामुळे बहुतांश शेतक-यांची दिवाळी कापसातून मिळणा-या उत्पन्नावर साजरी होते. परंतु, यंदा परतीच्या पावसाने शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरले. पावसामुळे वेचणीसाठी आलेल्या कापसाच्या वाती तयार झाल्या. सततच्या पावसामुळे बोंडे सडल्याने उत्पादनात मोठी घट होऊन कापसाची प्रतवारी घसरली. त्यामुळे बाजारात देखील कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही.
पारध परिसरात कापूस वेचणीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. अनेक शेतक-यांनी विदर्भातील मजूर आणून कापूस वेचणी सुरू केली आहे. हे मजूर कापूस वेचणीचे सहा रुपये किलोप्रमाणे दर घेत आहेत. तर वाहन भाडे वेगळे एक हजार रूपये शेतक-यांच्या माथी मारत आहेत. मात्र, मजूर मिळत नसल्याने आणि कापूस वेचावयाचा असल्याने शेतकरी विदर्भातील मजुरांच्या अटी मान्य करताना दिसत आहेत. दिवसाकाठी एक मजूर ४५ ते ५० किलो कापूस वेचतो. त्याला ३०० रुपये मजुरी द्यावी लागते. अनेक शेतकरी मजूर मिळत नसल्याने कुटुंबियांसमवेत कापूस वेचत आहेत. एकूणच यंदाचा हंगाम हा एक तर पावसाने वाया गेला, आणि आता मजुरांअभावी अडचण येत आहे.
पीक नुकसानीसाठी हेक्टरी ८ हजार रुपये मदत शासनाने जाहीर केली आहे. ही मदत केवळ दोन हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे. शेतकºयांना कपासासाठी एकरी ३५ हजार रूपयांवर खर्च करावा लागला आहे.
त्या मानाने शासनाने दिलेली मदत तोकडी असून, एक प्रकारे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे मत अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.