टेंभुर्णी : मागील वर्षापासून वाचनालयाचे ८० टक्के अनुदान रखडल्याने संपूर्ण वाचनालय चळवळ अडचणीत आली आहे. यामुळे शासनाने मोठ्या पोटतिडकीने सुरू केलेल्या गाव तेथे ग्रंथालय या वाचन चळवळीलाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप टेंभुर्णी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख रावसाहेब अंभोरे यांनी केला आहे.
दरवर्षी वाचनालयाचे अनुदान सहा सहा महिन्यांच्या दोन टप्प्यांत शासनाकडून वितरित केले जाते. यात कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, फर्निचर, पाठ्यपुस्तके खरेदी, वीजबिल, वर्तमानपत्र बिल आदी अनेक बाबींसाठी तरतूद प्राप्त करून दिली जाते. मात्र गतवर्षी याबाबत केवळ २० टक्के अनुदानच वितरित करण्यात आले असून, अन्य अनुदानासह चालू वर्षीच्या अनुदानाचा पहिला टप्पा अद्याप रखडला असल्याने वाचनालय चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचेही अंभोरे यांनी म्हटले आहे.
आजच्या संगणक आणि मोबाइलच्या युगात ग्रामीण भागात वाचन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम गाव पातळीवर ग्रंथालय करीत आहे. याशिवाय या ग्रंथालयातील उपयुक्त पुस्तकांचा लाभ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. मात्र आज ही वाचनालये चालवावी कशी, असा प्रश्न वाचनालय चालक विचारीत आहेत. अनुदान थकल्याने वाचनालयाची सर्वच बिले थकली आहेत. यासाठी वाचनालय चालकांना मोठ्या खस्ता सहन कराव्या लागत आहेत. रखडलेले हे अनुदान त्वरित देण्याची मागणी वाचनालय चालकांकडून होत आहे.