अबब! आरोग्य अधिकाऱ्याच्या वाहनात दारूच्या बाटल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:59 AM2020-04-19T03:59:12+5:302020-04-19T04:00:16+5:30
पावणे सात लाखांची रोकडही पोलिसांनी केली जप्त
बदनापूर (जि. जालना) : देशभरातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणुच्या संकटाशी लढत असताना औरंगाबाद जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल रामभाऊ गिते यांनी संचारबंदी आणि दारुबंदीचे उल्लंघन केले आहे. स्वत:च्या वाहनात पावणे सात लाख रुपयांची रोकड आणि दारुच्या बाटल्या बाळगल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना- औरंगाबाद महामार्गावरील वरूडी फाट्यावर (ता.बदनापूर) वाहनांची तपासणी सुरू असताना शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्या वाहनात (एम.एच.२०- सी.यू. ०३५) दारूच्या दोन बाटल्या आणि सहा लाख ७० हजार रूपयांची रक्कम आढळून आली. त्यात ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांचा समावेश होता. वाहनासह रकमेचा पंचनामा करण्यात आला असून, डॉ. गिते यांची चौकशी सुरू असल्याचे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि अनिरूध्द खेडेकर यांनी सांगितले. या प्रकरणी फौजदार शिवसिंग बहुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डॉ. गितेंविरूध्द दारूबंदीचे उल्लंघन, सीमाबंदी उल्लंघन, रोख रकमेचा हिशेब नसल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रोख रक्कमेविषयीची माहिती प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मी जिल्हा सीमा ओलांडणार नव्हतो
मी औरंगाबाद जिल्ह्याची सीमा ओलांडणार नव्हतो. चेकपोस्टवर माझे नातेवाईक पैसे घेण्यासाठी येणार होते. पैसे दिल्यानंतर मी परत औरंगाबादला जाणार होतो. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी माझी विचारणा केली. चौकशीचा भाग म्हणून मी त्यांना व्यवस्थित उत्तरे देऊन वाहनाची तपासणी करण्यास अटकाव केला नाही, असा दावा डॉ. अमोल रामभाऊ गिते यांनी केला.