जालना : महानगर पालिका प्रशासनाने सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत अतिक्रमण विरोधात मोहीम राबविली. या कारवाईत पक्क्या बांधकामासह ४० अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्यात आली. पहिल्या दिवशी फ्लॉरिन हॉटेल ते छत्रपती संभाजीनगर चौफुली महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. महापालिकेच्या या कारवाईमुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
जालना महानगर पालिकेची निर्मिती होताच आयुक्त संतोष खांडेकर यांनी शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्याशिवाय पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनीही शहरातील अतिक्रमणाच्या मुख्य समस्येला मार्गी लावण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील हॉटेल फ्लॉरिन ते छत्रपती संभाजीनगर चौफुली, छत्रपती संभाजीनगर चौफुली ते भोकरदन नाका, भोकरदन नाका ते बसस्थानक आणि बसस्थानक ते मामा चौक या प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचे नियोजन कले आहे. त्यानुसार संबंधित अतिक्रमणधारकांना वेळोवेळी नोटिसा देवून स्वत: अतिक्रमणे काढून घेण्यास बजावले होते.
आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागप्रमुख पंडित पवार, ११ स्वच्छता निरीक्षक, ५० कर्मचाऱ्यांच्या टीमने सोमवारी सकाळीच एक जेसीबी आणि १० ट्रॅक्टरच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू केली. हॉटेल फ्लोराईन ते छत्रपती संभाजीनगर चौफुली दरम्यान अतिक्रमण करून केलेली पक्की बांधकामे, टपऱ्या, पत्र्याचे शेड आदी जवळपास ४० अतिक्रमणे हटविण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. प्रमुख ामार्गावरील मामा चौकापर्यंतची अतिक्रमणे महापालिका प्रशासनाकडून हटविली जाणार आहेत.
रात्रीतूनच हटविली अतिक्रमणेमहापालिकेने कारवाई मोहीम हाती घेतल्याचे समजताच रविवारी रात्रीच बसस्थानकासमोर असलेली अतिक्रमणे अनेकांनी स्वत: काढून घेतली आहेत. बसस्थानकासमोरील अतिक्रमणे निघाल्याने या भागाने मोकळा श्वास घेतला असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
तर स्वत: अतिक्रमणे काढून घ्यावीतमहानगर पालिकेने शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटविण्यास सोमवारी प्रारंभ केला आहे. या मोहिमेत सातत्य राहणार असून, मामा चौकापर्यंतची अतिक्रमणे पहिल्या टप्प्यात हटविली जाणार आहेत. अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा महापालिकेची पथके कारवाई करतील.संतोष खांडेकर, आयुक्त महानगर पालिका