वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत थांबता येणार नाही. अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात रूपांतर होईपर्यंत अन् कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही. मी दि. १० फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी उपोषणातील तब्बल पाच महिने तीन दिवसांनंतर जरांगे पाटील हे गुरुवारी रात्री घरी पोहोचले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील हे घरी जाताच त्यांचे पत्नी, मुलगी व नातेवाइकांनी औक्षण करीत स्वागत केले. तसेच एकमेकांना पेढे भरत आनंद साजरा केला. त्यावेळी जरांगे पाटील यांच्या वडिलांनी त्यांना मिठी मारली. त्या वेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. समाजाच्या हट्टापायी आपण कुटुंबाकडे आलो आहोत. मी दोन दिवसांचा पाहुणा म्हणून आलोय. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.