अवकाळी बरसला; अनेक गावांच्या शिवारात गारपीट, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:11 AM2020-03-18T00:11:08+5:302020-03-18T00:11:28+5:30
जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना तालुक्यातील कडवंची, अंबड तालुक्यातील शहागड, बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी परिसरात गारपीठ झाल्याने रबी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे.
जालना शहरासह जिल्हाभरात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसात काढून ठेवलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच उभे असलेल्या पिकांचेही वादळी वारे, पावसामुळे नुकसान झाले होते. काही गाव व परिसरातील पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. मात्र, भरपाई मिळेल की नाही ? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
या घटनेला काही दिवस लोटतात न लोटतात तोच मंगळवारी सायंकाळीही वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात हजेरी लावली.
जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, वडगाव व परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीत द्राक्ष बागांसह रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरपंच चंद्रकांत पाटील, नंदापूर येथील नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, देळेगव्हाण परिसरातही गारपीट झाली. वादळी वा-यामुळे देळेगव्हाण परिसरातील झाडे उन्मळून पडल्याचे शेतकरी समाधान बनकर यांनी सांगितले. तर शेतातील शेडनेटचे जवळपास आठ लाखाचे नुकसान झाल्याचे कृष्णा सांगळे यांनी सांगितले.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, उज्जैनपुरी, भराडखेडा, कंडारी, अकोला, निकळक, वाल्हा, शेलगावसह परिसरालाही पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे गव्हासह काढणीआलेल्या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. रात्री उशिरापर्यंत शहरासह तालुक्याच्या विविध भागात परिसरातीही वादळी वा-यांसह विजा चमकून पावसाच्या सरी बरसत होत्या.
दरम्यान, वादळी वा-यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
जालना जिल्ह्यात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात रबी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागात पुन्हा वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला.
या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना मोठा फटका बसला आहे. झाडे उन्मळून पडल्यानेही नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन्ही वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.