राजूर (जालना ) : गरीबांसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याच्या गव्हात शासकीय यंत्रणेच्या निष्काळजी पणामुळे युरियासह रासायनिक खताचे मिश्रण निघाल्याने राजूरात खळबळ ऊडाली आहे. या निषेधार्थ सोमवारी (दि. २२ ) स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी छत्रपती शिवाजी चौकात बैल गाडीसह रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
शासनाकडून गोरगरिबांसाठी स्वस्त धान्य योजना राबवण्यात येत आहे. राजूर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८९ मधून काही शिधापत्रिका धारकांनी गहू खरेदी केला. गव्हामध्ये रासायनिक खताचे मिश्रण असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिधापत्रिका धारकांत खळबळ ऊडाली होती. शासकीय यंत्रणा सर्वसामान्याच्या जीवावर उठल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पुंगळे यांनी स्वस्त धान्य पुरवठादाराची चौकशी करण्यात यावी, तसेच राजुरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. यावेळी दुकानदारांनी आपली दुकाने बंद करुन आंदोलनाला पाठिंबा दिला होता. जि. प. सदस्य कैलास पुंगळे, बळीराम पुंगळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.वैजीनाथ ढोरकुले, विष्णू सानप, जगन पवार, राजू पुंगळे, भरत पुंगळे, गजानन जुंबड, सुधाकर पिंपळे, भागाजी भाडळकर, माधवराव भालेराव, नाना पवार, तुळशिराम जुंबड, विक्रम पिंपळे यांच्यासह शेतकरी, शिधापत्रिकाधारकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.