मोबाईलने बिघडवले विद्यार्थ्यांचे आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:50+5:302021-03-10T04:30:50+5:30
जालना : गत काही वर्षांपासून मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला. अशातच कोरोनाचा शिरकाव झाला आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश मुलांच्या हाती ...
जालना : गत काही वर्षांपासून मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला. अशातच कोरोनाचा शिरकाव झाला आणि ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश मुलांच्या हाती मोबाईल आला. परंतु, मोबाईलच्या अतिवापराचा मुलांच्या मानसिकतेवर, शरीरावर मोठा परिणाम होत आहे.
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि मुले घरात कोंडली गेली. त्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांच्या वतीने ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. दैनंदिन दोन - तीन तास हे क्लासेस होतात. त्यानंतर होमवर्क घेणे, होमवर्क पाठविणे, इतर अभ्यासक्रम, यु-ट्यूबवरील अभ्यासाचे व्हिडिओ पाहणे आदींंसाठी लहान मुलांच्या हाती मोबाईल राहात आहे. परंतु, अनेक मुले अभ्यासाव्यतिरिक्त गेम खेळणे, यू-ट्यूबवर कार्टून पाहणे, लहान मुलांचे चित्रपट पाहणे यांसह इतर अनावश्यक बाबी मोबाईलवर पाहात आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर परिणाम होत असून, मुले मैदानी खेळापासूनही दूर जात असून, मोबाईलचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे.
मुले कायम मोबाईलवर
दैनंदिन शाळांचे ऑनलाईन दोन ते तीन तास होतात. मुले होमवर्क व इतर अभ्यास मोबाईलवरच पाहतात. त्यानंतर मात्र, कार्टून पाहणे, मोबाईलवरील विविध गेम खेळणे, लहान मुलांचे चित्रपट पाहण्यात व्यस्त होऊन जातात. मुलांनी बाहेर जाऊ नये, यासाठी पालक त्यांना मोबाईल देत असल्याचे अंबड येथील शिवाजी बजाज म्हणाले.
विटीदांडू गायब
आमच्या काळात विटीदांडू, कबड्डी, खो- खो, सूरपारंब्या, काचेच्या गोट्या, आंब्याच्या कोया खेळणे आदी खेळ आम्ही खेळत होतो. परंतु, काळ बदलला, आधुनिक युगात खेळही बदलले. आजची मुले तर मैदानावर कमी आणि मोबाईलवर जास्त गुंगलेली दिसतात. त्यात कोरोनामुळे मुले घरात बंदिस्त झाल्याने मैदानी खेळ कमी झाल्याचे मापेगाव बु. येथील आसाराम दुगाने म्हणाले.
कोरोनामुळे मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
कोरोनामुळे मुले घरात कोंडली गेली आहेत. त्यामुळे घरातच बसून मुले मोबाईल गेम, कॅरम, सापसिडी, चेस, टीव्ही गेम खेळत आहेत. त्यामुळे मैदानावरील सांघिक, वैयक्तिक खेळाचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे वडीगोद्री येथील विजय चव्हाण यांनी सांगितले.
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम पडतो. नकारात्मकता, उदासिनता वाढू लागते. शिवाय मोबाईलमधील गेम चॅलेंजमुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना आहेत. या बाबी पाहता लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे.
- डॉ. नितीन पवार, मानसोपचारतज्ज्ञ