मोदीमुक्त भारतासाठी एकत्रित या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:04 AM2018-09-11T01:04:13+5:302018-09-11T01:04:31+5:30

केंद्र सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे. बेरोजगारी, वाढती महागाई आणि सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. मामा चौक, महावीर चौक मार्गे गांधी चमन येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

Modi is united for free India | मोदीमुक्त भारतासाठी एकत्रित या

मोदीमुक्त भारतासाठी एकत्रित या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे. बेरोजगारी, वाढती महागाई आणि
सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. मामा चौक, महावीर चौक मार्गे गांधी चमन येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आ.कैलास गोरंट्याल, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, आर.आर.खडके, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष विमल आगलावे, कल्याण दळे, राजेंद्र राख, शेख महेमूद, महावीर ढक्का आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी काँग्रेसच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून वातावरणात जल्लोष निर्माण केला होता.
पुढे बोलतांना भीमराव डोंगरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना काँग्रेसवर टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे दर हे ७१ रूपये लिटर होते ते आज ९० रूपयांवर पोहोचले आहेत. अशीच अवस्था डिझेलची आहे. शेतकरी, व्यापारी यांनाही मोदी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसून स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी अद्यापही लागू केल्या नाहीत. महागाई वाढत असतांना पंतप्रधान मोदी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या सरकारची नीती कशी आहे, हे जनतेसमोर येते असे सांगून डोंगरे यांनी मोदीमुक्त भारत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांसह जनतेने एकत्रित येण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी विमल आगलावे, गजानन गिते, तुळशीराम चंद, विजय कामड यांनी मार्गदर्शन केले. त्यांनीही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर जोरदार हल्ला चढविला.
महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याचा आरोप विमल आगलावे यांनी केला, तर दळे यांनीही अनेक उदाहरणे देऊन सरकार जनतेची कशी फसवणूक करते हे दाखवून दिले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी संचालन केले. काँग्रेसच्या या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिगेड यांनी पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मानले. तसेच केंद्र सरकारच्या धोरणांवरही त्यांनी ताशेरे ओढले.

भोकरदन : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (ता. १०) भारत बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात रॅली काढून बंद पाळण्यात आला. या रॅलीमध्ये कॉंग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे विविध सामाजिक संघटना व सम विचारी पक्ष सहभागी झाले होते. देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. मात्र,महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे या विरोधात सोमवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून, सोमवारी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विरोधी पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बदनापूर - शासनाच्या दुर्लक्षामुळे महागाई वाढल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या मोर्चा व बंदला राष्ट्रवादी, मनसे व इतर राजकीय पक्षांनीसुध्दा पाठिंबा दिला इंधन दरवाढ, राफेल घोटाळा,शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी इ. मुद्यांवर सोमवारी बदनापूर येथे काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढून बंद पाळण्यात आला़ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरूवात करण्यात आली, हा मोर्चा जालना-औरंगाबाद महामार्ग, बालाजी गल्ली, बाजार गल्ली, पोलीस ठाणे रोड व शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला यावेळी अनेकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
परतूर: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ काँगे्रस पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला सोमवारी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या बंद दरम्यान सर्वच प्रतिष्ठाने बंद आढळून आली हे विशेष होय. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. मागील ५२ महिन्यात ११ लाख कोटीचा नफा या सरकारने कमावला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही पेट्रोल, डिझेलचे दर भडकलेलेच आहेत. पेट्रोल ८९ रू. तर डिझेल ७५ रू. प्रतिलिटर दरोने विकत आहे. इंधनाबरोबरच इतर वस्तूंनीही महागाईचा कळस गाठला आहे. या वाढत्या महागाईमुळे, सर्वसामान्य नागरिक, उद्योजक अडचणीत आले आहेत. या सरकारचे धोरण सर्वसामान्यविरोधी असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला प्रतिसाद देत शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
अंबड -देशात पेट्रोलजन्य वस्तूंच्या वाढत्या किंमती मुळे जनसामान्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जनसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले असून सत्तेतील भाजपा सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व मनसेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी झालेले कार्यकर्त्यांनी बाजार पेठ बंद ठेवली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यापारी बांधवाना बंदचे शहरभर फिरून आवाहन केले होते त्या अनुषंगाने व्यापारी बांधवानी सकाळ पासूनच आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदमुळे शाळा, महाविद्यालये देखील सोमवारी बंद होती. वाहतुकीवरही बंदचा परिणाम दिसून आला. बंदच्या वेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
जाफराबाद : केंद्र व राज्य शासनाच्या प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला जाफराबाद शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ वाजेपासून छञपती शिवाजी महाराज चौक परिसरात शेतकरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व तरुणांनी एकत्र येऊन शासनाचा निषेध करीत घोषणा दिल्या. शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून, पोलीस स्टेशन परीसर, बसस्थानक, बाजारगल्ली, पाण्याची टाकी, अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, तहसील परिसर, पंचायत समिती परिसरातील मुख्य मार्गाने रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या अपयशाचा पाढा वाचत मागण्या मान्य करुन इंधन भाववाढ थांबवावी यासाठी प्रमुखांनी भाषणे केली. दुपारी १२ वाजता बंद संपवून नायब तहसीलदार जी.डी.खैरनार यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
घनसावंगी : पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमती वाढल्यामुळे महागाईच्या विरोधात सोमवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदला घनसावंगी शहरामध्ये शून्य प्रतिसाद मिळाला. घनसावंगीत सकाळपासूनच सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. शाळा, महाविद्यालय, व्यापारी संस्थाने सर्व सुरळीत चालू होते. परंतु तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, मच्छिंद्रनाथ चिंचोली मध्ये ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. जनतेने व व्यापाºयांनी स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापारी संस्थाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला. घनसावंगी शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारलेल्या बंद करण्यासाठी घनसांगवी शहरात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता कोणीच आला नाही या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देणारा एकही पक्षाचा कार्यकर्ता फिरकला नाही. रोजच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असताना घनसावंगीकरांचा बंदला पाठिंबा नसल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे
मंठा : पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढत जाणाºया किमतीच्या तसेच महागाई आणि शेतकºयाच्या प्रश्नावर काँग्रेस पुरस्कृत भारत बंदला मंठा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला . यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी तहसीलदार सुमन मोरे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया , माजी समाज कल्याण सभापती राजेश राठोड , गणेश बोराडे, अँड. पंकज बोराडे, नीळकंठ वायाळ, किसनराव मोरे, अँड. मधुकर मोरे , सिराज पठाण, प्रकाश घुले, भाऊसाहेब गोरे, गणेश बोराडे, कय्युम कुरेशी, शबाब कुरेशी, भाऊसाहेब खंदारे, अजित बोराडे, बालासाहेब घनवट, बाळासाहेब वांजोळकर, विठ्ठल बागल, सुरेश वाव्हळे, राजेश खरात, राजेश खंदारे, विजय राठोड इ. पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला येथील फाट्यापसून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. यादरम्यान शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकाºयांची भाषणे झाली. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जेथलिया , माजी सभापती राजेश राठोड, पंकज बोराडे, भाऊसाहेब गोरे, गणेश बोराडे, भाऊसाहेब खंदारे, मधुकर मोरे आदींनी आपल्या भाषणातून वाढत जाणारी महागाई आणि मोदी सरकारच्या फसव्या घोषणावर सडकून टीका केली. सर्व प्रतिष्ठाने, छोटी दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद होती.

Web Title: Modi is united for free India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.