विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील मृणाल हिवराळे हिने अवघ्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भारत देशाचे नेतृत्व करीत ‘लक्ष’वेधी कामगिरी केली आहे. धनुर्विद्येच्या सिनिअर वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले असून, पाच एशिया स्पर्धेत सहभागी होऊन चार पदके तिने मिळविली आहेत.धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात मृणाल अनिल हिवराळे हिने आपला ठसा उमटाविला आहे. मृणाल अनिल हिवराळे हिने सन २०१४ मध्ये प्रशिक्षक प्रकाश दुसेजा यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेऊन सरावाला सुरूवात केली. सरावातील सातत्यामुळे २०१४ मध्येच १३ व्या राज्यस्तरीय सिनिअर स्पर्धेत तिने सहभाग नोंदविला. तसेच याच कालावधीत सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग नोंदविला. पुणे येथे २०१४ मध्येच झालेल्या १४ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत २ सुवर्णपदके पटकाविली. इथून सुरू झालेल्या प्रवासात पुन्हा मृणालने मागे वळून पाहिले नाही. २०१६ मध्ये जमशेदपूर (जामखेड) येथे झालेल्या ३८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले.धनुर्विद्या स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिची २०१६ मध्ये बँकाँक येथे झालेल्या एशिया कप स्पर्धेत निवड झाली. येथे तिने चौथी रँक पटकाविली होती. २०१७ मध्ये झालेल्या ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत ३ ब्राँझपदकांची तिने कमाई केली. तर २०१७ मध्ये सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन एक सुवर्ण व एक ब्राँझ पदक पटकाविले.मार्च २०१७ मध्येच एशिया कपमध्ये, त्यानंतर यूएसएमध्ये झालेल्या सिनिअर वल्डकपमध्ये, तसेच अर्जेंटिना येथे झालेल्य वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सहभाग नोंदविला. २०१८ मध्ये ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेत एक सुवर्ण, एक ब्राँझ पदक पटकाविले. बँकाँकमध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेत एक ब्राँझ पदक तर फिलिपाईन्समध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेत १ सिल्व्हर व २ ब्राँझ पदक पटकाविले आहे.सराव महत्त्वाचामृणाल हिवराळे ही धनुर्विद्येचा दैनंदिन सहा ते तास सराव करते. सरावातील सातत्यामुळे तिला विविध स्पर्धांमध्ये यश मिळाले आहे. यापुढील काळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे मृणाल हिवराळे हिने सांगितले.विद्यापीठ स्पर्धेतही वर्चस्वमृणालने विद्यापीठाच्या स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व राखले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत एक सुवर्ण व चार सिल्व्हर पदके पटकाविली. डिसेंबर २०१८ मध्ये भुवनेश्वर येथेच झालेल्या राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत एक सुवर्ण, एक सिल्व्हर आणि एक ब्रँझ पदक पटकाविले आहे.
मृणालची जागतिक पातळीवर ‘लक्ष’वेधी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:28 AM