वाशिम जिल्ह्यात खुन करुन मृतदेह फेकला जालन्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:47 PM2019-03-07T18:47:30+5:302019-03-07T18:47:49+5:30
जालना पोलिसांनी ओडीसा येथील दोन आरोपींना मुद्देमालासह आज ताब्यात घेतले.
जालना : चोरीच्या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील ढाब्यावर दोघांनी एका व्यक्तीस मारहाण करुन त्याचा खुन केला. त्याचा मृतदेह ट्रकमध्ये घेऊन जालना शहराजवळील खादगाव फाटा येथे फेकून एक लाख रुपयाचे लोखंडी पाईप चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी ओडीसा येथील दोन आरोपींना मुद्देमालासह गुरुवारी ताब्यात घेतले. निरंजन ऊर्फ रंजान विजय प्रधान (२२. रा. बालीजेरंग ता. अेस्कावली जिल्हा अंगुल, ओडीसा), रिलु मसरु चलान (२५. रा. सानसिंगारी ता. जि. संभलपुर, ओडीसा) असे आरोपींची नावे आहे.
जालना - औरंगाबाद रोडवरील खादगाव फाट्याजवळ १ मार्च रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना माहिती मिळाली की, हा खुन ओडीसा येथील आरोपींनी केला असून ते सध्या पुणे जिल्ह्यातील राजणगाव, चाकण, एमआयडीसी, सिक्रापुर या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्यांचा शोध घेतला असता, ते दोघेंही येथे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी सदरील खुनाची कबुली दिली. दोघांना अटक करुन आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला ट्रक (क्रमांक ओडी. १५. जी. १६८६) आणि पाईप, पाईप विक्री करु न आलेल्या रक्कमेतून खरेदी केलेले नवीन मोबाईल अणि उवर्रित रक्कम असा एकूण १ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, पोलीस नाईक सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, पो. कॉ. सचिन चौधरी, विलास चेके यांनी केली.