गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:04+5:302021-06-20T04:21:04+5:30
जालना : कोरोनामुळे वाढती बेरोजगारी गुन्हेगारी वाढीला कारणीभूत ठरू लागली आहे. त्यात नव्या गुन्हेगारांचाही समावेश आहे. सराईत गुन्हेगारांप्रमाणेच हे ...
जालना : कोरोनामुळे वाढती बेरोजगारी गुन्हेगारी वाढीला कारणीभूत ठरू लागली आहे. त्यात नव्या गुन्हेगारांचाही समावेश आहे. सराईत गुन्हेगारांप्रमाणेच हे गुन्हेगार संधी साधून चोऱ्या करू लागल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीपासून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाने दीड वर्षापासून सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दररोज नवे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाला कडक निर्बंध लागू करावे लागले होते. गतवर्ष लॉकडाऊनमुळे, तर चालू वर्ष कडक निर्बंधांमुळे गेले. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू असल्या, तरी इतर व्यवसाय ठप्प होते. संचारबंदीचे आदेश असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय इतर कारणांसाठी घराबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. व्यवहार ठप्प असताना व अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याने पोलिसांना तपास लावण्यात मोठी कसरत करावी लागत आहे.
काळजी घ्यावी
गुन्हेगारीमध्ये नव्याने पाऊल टाकणाऱ्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. बेरोजगारीमुळे तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. नवीन गुन्हेगारांना शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी आपल्या घरासह वाहनांची काळजी घ्यावी.
- सुभाष भुजंग
पोनि. स्थानिक गुन्हे शाखा, जालना
n इतर गुन्ह्यांच्या तुलनेत घरफोडी, वाहनचोरी या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना कसरत करावी लागत आहे. सक्रिय टोळ्यांमध्ये पोलिसांना खबऱ्यांचे जाळे वाढविण्याची गरज आहे.
गुन्हेगारीत नवे चेहरे
का आले?
n गुन्हेगारीत नव्यानेच आलेल्यांमध्ये अनेकांपुढे बेरोजगारी व मिळालेली संगत कारणीभूत दिसून येत आहे.
n संधी साधून चोऱ्या करणे सहज सोपे असल्याने या गुन्ह्यात अनेकजण पाय रोवून पाहत आहेत.
n काही तरुण नशा करून चोऱ्या करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.