सायबर भामट्यांचा नवा फंडा; 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या आमिषाने ३५ लाखांना गंडवले
By दिपक ढोले | Published: September 11, 2023 12:52 PM2023-09-11T12:52:30+5:302023-09-11T12:52:41+5:30
जास्तीच्या पैशांचे आमिष पडले महागात; खबरदारी घेण्याचे आवाहन
जालना : ‘नमस्कार... मी एका कंपनीतून बोलतेय, तुम्हाला घरबसल्या काम पाहिजे असेल तर एक टास्क दिले जाईल, ते पूर्ण करा, त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील,’ असे सांगून जिल्ह्यात जवळपास सहाजणांना ३५ लाख २५ हजार ५०० रुपयांना सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तीन महिला व तीन पुरुषांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे. संबंधित व्यक्ती टेलिग्राम, व्हॉट्सॲपवर मेसेज करून किंवा फोन करून मी अमुक कंपनीतून बोलताेय, तुम्हाला घरबसल्या पैसे कमविण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करा. त्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागतील. हे पैसे भरल्यानंतर काहीवेळातच ते पैसे फिर्यादीच्या आयडीवर दुप्पट झालेले असतील, अशी वेगवेगळी कारणे देऊन फिर्यादीकडून पैसे घेतले जातात. कोणी दोन तर कोणी तीन लाख रुपये देतात. पैसे काढण्याची मागणी केली असता, ती लिंक ब्लॉक होऊन जाते. अशाच प्रकारे जिल्ह्यात मागील महिनाभरात जवळपास सहाजणांची ३५ लाख २५ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टास्क पूर्ण करण्यास सांगून शिक्षकाला ९३ हजारांना गंडा
टास्क पूर्ण करण्याचे सांगून सुरुवातीला १५० व १३०० रुपये ऑनलाइन पाठवून एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी ९३ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शहरातील मुर्गी तलाव भागात राहणारे शिक्षक आशिष मुरलीधर उपाध्याय (४९) यांनी फिर्याद दिली आहे.
तरुणाला तीन लाखांना घातला गंडा
सायबर भामट्यांनी टेलिग्राम आयडीच्या माध्यमातून टास्क पूर्ण करण्याचे सांगून एका तरुणाला तीन लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना शहरातील योगेशनगर भागात उघडकीस आली. या प्रकरणी महेशकुमार बन्सीदास भुगरे (३३) यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी होतेय फसवणूक
अनोळखी क्रमांकावरून एका कंपनीकडून मोबाइलवर टेक्स्ट मेसेज येतो. वर्क फ्रॉम होमसाठी उमेदवार शोधत असल्याचे सांगून कंपनीचे टेलिग्राम चॅनल जाॅइन करण्यास सांगितले जाते. चॅनल जाॅइन केल्यानंतर एक टास्क दिला जातो. तो टास्क पूर्ण केल्यानंतर ट्रेडिंगसाठी इतर लोकांशी संपर्क करून टास्क देत पैशांची मागणी केली जाते. जास्तीचे पैसे आल्यानंतर लिंक बंद केली जाते, तर यू-ट्यूब व्हिडीओ लाइक केल्यास १५० रुपये मिळतील, असा मेसेज पाठवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे.
खबरदारी घ्यावी
मागील काही दिवसांपासून सायबर भामट्यांकडून टास्क देऊन फसवणूक केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास सहाजणांना ३५ लाखांना गंडा घातला आहे. त्यामुळे नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये. फसवणूक झाल्यानंतर तत्काळ सायबर पोलिसांना कळवावे.
- संभाजी वडते, सहायक पाेलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे