लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारत माता की, जयऽऽ.. वंदे मारतम्ऽऽ, अशा गगनभेदी घोषणा.. मुला-मुलींनी भारत माता, विठ्ठल- रूक्मिणीसह इतर महापुरूषांच्या केलेल्या वेषभूषा.. हाती असलेले ‘साहित्याच्या प्रांगणात एक नवा पडघम.. प्रतिभा संगम..’, ‘हैदराबाद प्रकरणाचा निषेध’चे नामफलक.. टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझीम पथकाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जालना येथे आयोजित प्रतिभासंगम विद्यार्थीसाहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी सकाळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीचे. प्रारंभी शहरातील गांधी चमन भागात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उद्योजक समीर अग्रवाल यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी उद्योजक सुनील रायठठ्ठा, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवरतन मुंदडा, सचिव प्रा. सुरेश केसापूरकर, उद्योजक घनश्याम गोयल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, ज्येष्ठ साहित्यिका रेखा बैजल, शिवकुमार बैजल, भास्कर दानवे, निमंत्रक सुरेश कुलकर्णी, प्रा. डॉ. आनंद कुलकर्णी, ओमप्रकाश चितळकर, डॉ. श्रीमंत मिसाळ, संध्या देठे, मुरली काकड, संजय देठे, विजय देशमुख, प्रा. दिलीप अजुर्ने, सतीश कापसे, विनोद चोबे, अनिकेत शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.या ग्रंथदिंडीत दुचाकीस्वार मुली, पाठीमागे शेतकऱ्यांचे प्रतीक असणारी बैलगाडी, त्याच्या मागे विठ्ठल- रूक्मिणी, भारतमातेची वेशभूषा केलेले विद्यार्थी, घोडेस्वार, लेझीम पथक, बालवारकरी पाऊली खेळत करीत असलेला टाळ-मृदंगाचा गजर, हाती असलेले जागृतीपर घोषवाक्याचे फलक आणि विद्यार्थी देत असलेल्या गगनभेदी घोषणा हे शहरवासियांसाठी आकर्षणाचा विषय ठरले. ही ग्रंथदिंडी गांधी चमन, मंमादेवी, पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भागात नेण्यात आली. येथे या ग्रंथदिंडीचा समारोप झाला. शेवटी आनंद कुलकर्णी यांनी आभार मानले.शहरातील महाराजा अग्रसेन फाऊंडेशन येथे शनिवारी सकाळी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. १ व २ फेब्रुवारी या कालावधीत संमेनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शहरवासियांसाठी, साहित्यिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.
साहित्याच्या प्रांगणात नवा पडघम, प्रतिभा संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 1:11 AM