रेल्वे पटरीवर एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:31 AM2021-04-20T04:31:16+5:302021-04-20T04:31:16+5:30
दारू बनविणारा पळाला जालना : जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यात गूळ मिश्रित दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आल्याचे पाहून ...
दारू बनविणारा पळाला
जालना : जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यात गूळ मिश्रित दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आल्याचे पाहून दारू तयार करणारा पसार झाल्याची घटना कैकाडी मोहल्ला भागात घडली. कैलास जायभाये यांच्या फिर्यादीवरून रवी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वाळूची अवैध वाहतूक तेजीत
जालना : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात अवैध वाळू विक्रीचा व्यवसाय चांगलाच तेजीत सुरू आहे. यातून मिळणाऱ्या चांगल्या कमाईमुळे अनेक गावांतील युवावर्ग अवैध वाळूचा व्यवसाय करीत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. रात्रंदिवस भरधाव अवैध वाळूचे ट्रक व हायवा सुसाट धावत आहे.
रुग्णालयासमोरून दुचाकी लंपास
जालना: अंबड शहरातील चव्हाण हॉस्पिटलसमोर प्रदीप नागोराव धर्माधिकारी यांनी सोमवारी दुपारी दुचाकी उभी केली होती. १५ हजार रुपयेे किमतीची ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. शोध घेऊनही दुचाकी सापडली नाही. त्यामुळे धर्माधिकारी यांनी अंबड पोलीस ठाण्यात रविवारी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
कोरोनामुळे लग्नसराई थंडावली
घनसावंगी : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा लग्नसराईवर ही मोठा परिणाम झाला आहे. शासनाने कोरोना निर्बंधामुळे मंगल कार्यालयांना नोटिसा बजावून पंचवीस लोकांनाच परवानगी दिल्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापाडले आहेत. कोरोनामुळे आठवडे बाजार बंद आहे. लग्नाला जास्त लोक जमा न करण्याच्या सूचना आहेत.
व्यापाऱ्यांसाठी २१ एप्रिलला सोमिनार
जालना : भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ व जनरल मर्चन्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील व्यापार करणाऱ्यांसाठी २१ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत मोफत ऑनलाइन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक शांतिलाला मुथ्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.
तीर्थपुरीत संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे संचारबंदी लागू केलेली असतानाही काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली असून, कॉर्नर, चौकामध्ये गटागटाने घोळका करून, टवाळ्या करत गप्पांच्या मैफिली पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून घरातच थांबावे, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतकडून देण्यात आला.
अंबड शहरातील स्वच्छता रामभरोसे
अंबड : अंबड शहरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरच जागोजागी कचरा साठला असून, गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग लागले आहे. एकंदरीत नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे येथील स्वच्छता ही रामभरोसेच असल्याचे चित्र सध्या दिसत असून, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित गुत्तेदारास साफसपाईचे बिले देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.