तीर्थपुरी : उसणे घेतलेले पैसे मागितल्याचा राग धरून तीन जणांनी एकाला मारहान केली. यात एकाचा मृत्यू झाला असून, तीन जखमी झाले आहेत. ही घटना घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ खरात येथे गुरूवारी रात्री घडली. यातील संशयीत तीन आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे. कैलास संजय खरात (३७) असे मयताचे नाव आहे.
मयताचा भाऊ विशाल खरात यांनी दिलेल्या फियार्दीवरून पोलिसांनी सांगितले की, मयत कैलास खरात यांचे गावातील गजानन आप्पासाहेब खरात यांच्याकडे उसनवारीचे दहा हजार रूपये अनेक महिन्यांपासून होते. पैसे देण्यास गजानन टाळाटाळ करीत होता. १६ एप्रिल रोजी कैलास खरात याने पैसे मागितल्याचा राग धरून गजानन खरात, किरण खरात व आबासाहेब खरात यांनी कैलास यास गावातील मारूती मंदिराजवळ लोखंडी पाईपसह काठीने मारहाण केली. दरम्यान मयताचा भाऊ विशाल खरात, तफान खरात व किशोर खरात हे वाद सोडविण्यासाठी गेल्याने त्यांनाही मारहाण करण्यात आली. मयत कैलास खरात यांनी रात्री साडेदहा वाजता गोंदी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती. घरी येताच कैलास यांना त्रास सुरू झाला आणि रात्री अडिच वाजता त्यांचा मृत्यू झाला. सदरील प्रकरणी विशाल संजय यांच्या फियार्दीवरून तीर्थपुरी पोलीस पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी गजानन खरात किरण, आप्पासाहेब खरात व आबासाहेब खरात यांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले होते. पुढील तपास तीर्थपुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, हेडकॉन्सटेबल ज्ञानेश्वर कंटुले, श्रीधर खडेकर करीत आहेत.