जालना : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि.प. शाळांमधील अंतराचा निकष डावलून सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी खाजगी शिक्षकांनीशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले.
बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या अनुपालनार्थ तसेच शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करावयाचे असल्यास पाचवीसाठी १ कि.मी व आठवीसाठी ३ कि. मी अतंर असणे गरजेचे आहे. परंतु, जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खाजगी संस्था असतांना १ कि.मी.च्या आतमध्ये ५ वी व ३ कि.मी. च्या आतमध्ये आठवीचा वर्ग सुरू केला आहे.
या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असतानाही हे वर्ग सुरू आहे. यामुळे खाजगी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने खाजगी शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ हे वर्ग बंद करण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांनी सीईओंकडे अनेकवेळा केली. परंतु, या मागणीची दखल न घेतल्याने शुक्रवारी २५ शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच चार तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहण्याचा इशारा शिक्षकांनी दिल्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे व शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी शिक्षकांची भेट घेतली. परंतु, शिक्षकांनी सीईओंना भेटण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी शिक्षकांची भेट घेऊन लवकरच मागणी मान्य करण्याचे आश्वासन शिक्षकांना दिले.
या आंदोलनात आर. ए. पाटील, एल. आर. कुºहाडे, एस. एम. आर्सुल, बी. आर. गायकवाड, व्ही. आर. कंचलवाड, ए. डी. मुळे, आर. व्ही. शेजूळ, शेख खालेद शे. अजिज, एल. बी. जाधव, के. आर. बोरडे, एम. पवार, कौतिक जंजाळ, मंगेश आंजरे, भागवत कडुळे, वैभव मुळी, बी. ए. उंडे, पी. एस. साठे, ए. के. कनके, डब्ल्यु. एम. वानखेडे, ए. एस. आमले, पी. ए. कोकणे, एच. के. पटेल, डी. बी. ठाकूर, एस. डी. गांगे, यु. एन. खांडेभराड आदींची उपस्थिती होती.
माहिती गोळा करण्याचे सीईओंचे आदेशशिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी लवकरच प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व माहिती गोळा करण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. ६ डिसेंबर रोजी याबाबत बैठक ठेवण्यात आली असल्याची माहिती शिक्षक वाघ यांनी दिली.