पावसाने खंड दिलेल्या मंडळात पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश
By दिपक ढोले | Published: August 22, 2023 08:27 PM2023-08-22T20:27:01+5:302023-08-22T20:27:10+5:30
पीकविम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
जालना : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुषंगाने पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड (साधरणपणे २१ दिवसांपेक्षा जास्त) असलेल्या जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांबाबत पीकविमा अधिसूचना निर्गमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनी व कृषी विभागास सोयाबीन व कापूस पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले.
पावसाच्या खंडामुळे उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आढळून आल्यास सदर मंडळातील शेतकऱ्यांना आगाऊ २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची तरतूद शासन निर्णयात आहे. त्यानुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, कृषी विभागातील अधिकारी, विमा प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.
या मंडळांमध्ये पावसाचा खंड
१ बदनापूर, दाभाडी, रोषनगाव २३ दिवस खंड
२ जालना शहर, पाचनवडगाव, रामनगर २३ दिवस खंड
३ राणीउंचेगाव २३ दिवस खंड
४ सातोना (खु.) २१ दिवस खंड