मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा - हर्षवर्धन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:52 AM2018-08-02T00:52:36+5:302018-08-02T00:52:49+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढून समाला दिलासा देण्याचे काम करावे, घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये याचा नंतर समावेश करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यायालयात रद्द होणार नाही, अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश काढून समाला दिलासा देण्याचे काम करावे, घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये याचा नंतर समावेश करून विशेष अधिवेशन बोलावून त्यासाठी कायदा केल्यास तो न्यायालयात रद्द होणार नाही, अशी मागणी आ. हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या जवळ मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलनास त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्यांना स्पर्श केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण समाज एकवटला आहे. असे असताना राजकीय पक्ष हे सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यासाठी आता मराठा समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून आरक्षण मिळविण्यासाठी दबाव टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एकूणच त्यांनी यावेळी सरकार आरक्षणा बाबत दिशाभूल करत असल्याचे सांगून, न्यायालय आणि मागास आयोगाकडे बोट दाखवत आहे. यावर उपाय म्हणून अध्यादेश काढून युवकांना हिंमत देण्याचे काम होऊ शकते. असे ते म्हणाले. पूर्वी दिलेली अनेक आश्वासने ही कशी फोल ठरली याची जंत्रीच आ. जाधव यांनी सादर केली. आपण या मुद्यावरून आक्रमक आणि भावनिक असल्याने राजीनामा देण्याचे धाडस केले. तसेच धाडस मराठा समाजाच्या खासदार आणि आमदारांनी दाखवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी संजीव भोर यांनी मराठा समाजाच्या युवकांवर हिंसक आंदोलनाचे निमित्त करून जे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा देतानाच नऊ आॅगस्टच्या आंदोलनासाठी गावागावात जाऊन आम्ही हे आंदोलन ऐतिहासिक करणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस संजय लाखे पाटील, भास्कर दानवे, संजय खोतकर, विष्णू पाचफुले, जगन्नाथ काकडे, प्रशांत वाढेकर, तुळशीदास चंद, राजेंद्र गोरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
लाडू येतील या भ्रमात राहू नये
आजचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्यावरून चालढकल करत आहे, हे जरी मान्य असले तरी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा नामोल्लेख न करता जाधव यांनी त्यांच्यावरही टीका केली. पंधरा वर्षे सत्तेत असताना आरक्षणा संदर्भात काही केले नसल्याचे सांगून, या आंदोनलाचा फटका हा भाजपला बसणारच आहे, त्यामुळे आपोआपच आपल्याकडे सहा महिन्यांनी सत्तेचा लाडू हा आपल्याकडेच येईल, या भ्रमात कोणी राहू नये असा टोला त्यांनी लगावल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकाला.