सीईओ पदाचा पदभार सवडे यांच्याकडे
जालना : येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. आर. सवडे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सुपूर्द करण्यात आला आहे. निमा अरोरा यांची अकोला येथे बदली झाल्यामुळे सवडे यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे.
साष्टपिंपळगाव आंदोलनाला पाठींबा
अंबड : तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी आंदाेलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावातील युवक दुचाकी रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. शिवसंग्रामच्या वतीने रविवारी एल्गार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीस अनुपस्थित शाळांना नोटिसा
जालना : आरटीई प्रवेशासाठी शाळांनी नियोजन करावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ७० शाळेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दांडी मारली. या बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या संबंधितांना शिक्षण विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग
हसनाबाद : येथील मधुनगर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी एकत्रित येत सर्व वर्ग खोल्यांची रंगरंगोटी केली आहे. रंगरंगोटीमुळे शाळेचा परिसर फुलला आहे. शिवाय या शाळा परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी मुख्याध्यापक रामदास लेंभ, वाडेकर, सरकटे, साळवे, चव्हाण आदींनी पुढकार घेतला.