अपर पोलीस महासंचालकांनी घेतला विविध विभागांच्या कामाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:44 AM2019-07-24T00:44:18+5:302019-07-24T00:45:17+5:30
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी, अशा सूचना राज्य पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस दल हे शिस्तीचे आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी, अशा सूचना राज्य पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या.
पोलीस मुख्यालयात मंगळवारी आयोजित कर्मचाऱ्यांच्या बैठकीत सेठ बोलत होते. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या नेतृत्वाखाली परेड झाली. परेडनंतर विविध विभागांतील पथकांनी आपल्या कामाबद्दल प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यात पीटी बॉल, विविध शस्त्रास्त्रांची हाताळणी, जमाव पांगविण्यासाठी केल्या जाणाºया उपाययोजना, पोलीस बँड, श्वान पथकाने आपल्या कामांचे प्रात्यक्षिक सादर केले. यानंतर आयोजित कर्मचा-यांच्या बैठकीत उपस्थितांचे प्रश्न जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर हसनाबाद व भोकरदन पोलीस ठाण्यातील कामकाजाची पाहणी सेठ यांनी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह सर्वच उपविभागीय अधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सेठ हे बुधवारी पोलीस मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी करणार आहेत. पोलीस मुख्यालयातील पाहणीदरम्यान सेठ कोणकोणत्या सूचना देतात, याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय परिस्थितीची माहिती
सेठ यांनी भोकरदन पोलीस ठाण्याच्या कामकाजाचीही पाहणी केली. यावेळी राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना यापूर्वी दानवे, खोतकरांमधील वाद आणि दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यांचीही माहिती घेतली.
याबाबत जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिका-यांना सूचना देत प्रस्ताव मंजुरीसाठी मदत करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाय, पोनि. दशरथ चौधरी व अधिकारी उपस्थित होते.
तक्रारींचा निपटारा
बैठकीत काही कर्मचा-यांनी उच्च शिक्षणासाठी अनुदान, इन्क्रीमेंट, पदोन्नती, कार्य नोंदणी यासह इतर अडचणी रजनिश सेठ यांच्यासमोर मांडल्या होत्या. सेठ यांनी या तक्रारींबाबत संबंधित अधिकारी, कर्मचा-यांकडून माहिती घेत तक्रारींचा निपटारा केला.
तीन तास तपासणी
हसनाबाद : रजनीश सेठ यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यातील विविध विभागांची तीन तास तपासणी केली. प्रारंभी मानवंदना देऊन सपोनि एम.एन.शेळके, फौजदार गुलाब पठाण यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर कर्मचारी निवासस्थानांची पाहणी करून त्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीचे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच नागरिकांशी समस्यांसह इतर विषयांवर चर्चा केली. ठाण्याच्या परिसरातील वृक्षलागवड, स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय उपस्थित होते.