लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : तालुक्यातील वडीगोद्री शिवारात दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी वनविभागाच्या अधिका-यांनी या भागात पाहणी केली.धीरज दिलीपराव काळे यांच्या जालना-बीड रोडवरील शेतात नेहमी कुत्रा बांधलेला असतो. मंगळवारी हा सकाळी हा कुत्रा अंगावर जखमा झालेल्या अवस्थेत मृत झाल्याचे आढळून आले. आजूबाजूला केलेल्या पाहणीत जमिनीवर प्राण्यांचे मोठे ठसे आढळून आले. काही शेतक-यांनी हे ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुभाष रामचंद्र मांगदरे यांच्या शेतातील म्हशीच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याचे शेतातील कामगारांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या बाजूच्या शेतात निघून गेला. बुधवारी चक्रधर मस्के हे सकाळी आठ वाजता शेतातून येत असताना जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या बाजूला बिबट्या रस्ता ओलांडताना त्यांनी पाहिले. याबाबत त्यांनी गावात माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिका-यांनी या भागात गुरुवारी पाहणी केली. बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या कर्मचा-यांनी सांगितल्याचे वडीगोद्री येथील ग्रामस्थ धीरज काळे सांगितले. दरम्यान, परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वडीगोद्री शिवारात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:05 AM