सत्संगातून आत्मकल्याणाचा मार्ग - रमेश महाराज कस्तुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:23 AM2019-02-14T01:23:59+5:302019-02-14T01:24:26+5:30
सुख हे केवळ संतवाणीत असून आत्मकल्याणाचा मार्ग देखील सत्संगातच आहे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : टीव्ही, मोबाईलचा नाद सोडा, त्यात इतकं गुरफटून जाऊ नका. त्यानं काहीही मिळणार नाही. सुख हे केवळ संतवाणीत असून आत्मकल्याणाचा मार्ग देखील सत्संगातच आहे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी येथे बोलताना दिला.
अंबड रोडवरील श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर परिसरात अखंड शिवनाम सप्ताहातील संगीतमय शिवकथेचे तिसरे पुष्प गुंफताना कस्तुरे महाराज बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मोबाईल, टीव्हीतून काय मिळतं? काही क्षणाची करमणूक करणारी ही साधनं मनुष्य जीवन कधी नष्ट करुन टाकतात हेही कळत नाही. हा नरदेह क्षणभंगुर असल्याने त्याचा उपयोग असा करुन घ्या की, चार- चौघांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. काही मुलं- मुली आणि माणसं देखील मोबाईलमध्ये इतकी गरफटून जातात की त्यांना शेजारी काय चालू आहे हेही कळत नाही. अनेकदा तर रस्त्याने चालतानाही हातातला मोबाईल सुटत नाही. चालता- चालता देखील मोबाईल हाताळतात. अनेक अपघात मोबाईलमुळं होऊ लागली आहेत. मोबाईल हा मानसिक रोगाचं साधन बनला आहे. हजारोंच्या संख्येने माणसोपचार तज्ज्ञांची रुग्णालये खचाखच भरु लागली आहेत. मोबाईलचा चांगला परिणाम किती हे माहीत नाही. परंतु दुष्परिणामाच्या गोष्टी कानावर आल्या की, वाईट वाटते. गृहिणी देखील मोबाईलबरोबरच टीव्हीच्या कार्यक्रमात व्यस्त झालेल्या दिसतात. परंतु हे बरोबर नाही. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की तेथे वाईट घडण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच अनेकदा वाटते की, पूर्वीचा काळ खरंच चांगला होता. राहायला चांगली घरं नव्हती, अंगावर चांगली कापडं नव्हती, नाना प्रकारचे पदार्थ नव्हते, मात्र आनंद आणि प्रेम इतकं होतं की, आप- पर भेदाला छेद देण्याची शक्ती प्रेमात होती.
माणूस- माणसाला ओळखत होता. आज मोबाईल- टीव्हीने प्रत्येकात आणि घरातल्या कुटुंबात देखील परकेपणा आणला आहे. कुटुंबातील प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेले असतात हे कुठे तरी थांबविण्याची वेळ आली आहे.