लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील सहा महिन्यांपासून गुन्हे प्रलंबित ठेवलेल्या जिल्ह्यातील ५९ पोलीस कर्मचा-यांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुरुवारी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, येत्या दोन दिवसात लेखी उत्तर देण्याचे आदेश त्यांनी कर्मचा-यांंना दिले आहेत.जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत अवैध गुन्ह्यांबाबत अनियमितता केल्याने त्या-त्या परिसरात अवैध धंदे बोकाळले आहेत. यामुळे संबंधित पोलिस ठाण्यांच्या दहा पोलीस निरीक्षकांचा अहवाल आयजींना, तर आठ सहायक पोलीस निरीक्षकांना एसपींनी कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस ठाण्यांच्या ज्या पोलीस कर्मचाºयांनी मागील सहा महिन्यांपासून गुन्हे प्रलंबित ठेवले आहेत, अशा ५९ पोलिस कर्मचा-यांनाही नोटिसा देऊन दोन दिवसात अहवाल सादर करण्याचा अल्टीमेटम दिल्याने पोलीस प्रशासकीय विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोकेवर काढले आहे. चालू वर्षात तब्बल ४ हजारांच्या जवळपास गुन्हे घडले आहेत. विशेष करुन त्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळलेले असतानाही पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, बीट अंमलदार, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे अवैध धंदे वाढून जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. अवैध दारु विक्री, रस्त्यातच धिंगाणा घालणे, अवैध वाहतूक, वाळू उपसा असे अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. दारु अड्डे, जुगार, मटका आदी अवैध धंदे सर्रास चालू असतात. या गुन्ह्यांवर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांची पथके थेट मैदानावर उतरली आहेत.कारवाई होताच पोलीस अधिकारी लागले कामालादरम्यान, बुधवारी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील १० पोलीस निरीक्षकांचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला. तर, सहाय्यक पोलिस निरीक्षकांना नोटीसा बजावल्या आहेत. या कारवाईमुळे गुरुवारी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या अधिका-यांनी कारवाई करण्याला सुरुवात केली आहे.
प्रलंबित गुन्हे; ५९ पोलीस कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:45 AM