तक्रारदाराने जात वैधता प्रमाणपत्रासाठी जालना येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत अर्ज दिला होता. तक्रारदारास जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी येथील शिपाई भाऊसाहेब सरोदे यांनी ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ फेब्रुवारी रोजी याची तक्रार औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाकडे केली. या तक्रारीवरून सोमवारी लाचलुचपत विभागाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात सापळा लावला. यावेळी पंचांसमक्ष भाऊसाहेब सरोदे यांनी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोना. अरुण उगले, पोना. संतोष जोशी, केवलसिंग, चांगदेव बागुल आदींनी केली.
जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी ६० हजारांची लाच घेताना शिपाई अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:33 AM