पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:36 AM2019-10-04T00:36:08+5:302019-10-04T00:36:33+5:30
दुष्काळामुळे शेतकरी हैराण असतांना यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळामुळे शेतकरी हैराण असतांना यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाची टक्केवारी घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही कर्ज वाटपाची टक्केवारी घटण्यामागे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील जुनी थकबाकी न भरल्याने बँकांनी कर्ज वाटपाचा हात आखडता घेतल्याचे सांगण्यात आले. दुष्काळ असल्याने दुष्काळी अनुदान तसेच पीकविमा मिळून जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एक हजार कोटी पेक्षा अधिक रूपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, परंतु त्यातून कर्ज वसुली न करण्याचे निर्देश असल्याने बँका हतबल झाल्या आहेत.
गेल्या वर्षीचा विचार करता जालना जिल्ह्यात जवळपास एक हजार शंभर कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. यंदाच्या कृषीपत आराखड्यातही जवळपास अकराशे कोटी रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी यंदा केवळ चारशे कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही कर्ज वाटपाची टक्केवारी का घसरली या संदर्भात दोन ते तीन बँक अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शेतक-यांना यंदाचे वर्ष हे निवडणूकीचे असल्याचे माहीत होते. त्यामुळे एखाद्यावेळी सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा अपेक्षित होती. त्यामुळे त्यांच्याकडील पीककर्जाची थकबाकी त्यांनी न भरल्याने आम्ही आधीच थकबाकीत असलेल्यांना बँकेच्या व्यवहारानुसार कर्ज देता येत नाही.
याचाही मोठा परिणाम कर्ज वाटपावर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील यंदा कर्ज वाटपात हात आखडता घेतल्याचे वास्तव आहे. दरम्यान एकट्या जिल्हा बँकेने त्यांना दिलेल्या ८५ कोटी रूपयांच्या पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी ५५ टक्के कर्ज वाटप केले आहे. यंदा खरीप हंगामातच पावसाने दगा दिल्याने रबी हंगमाचा प्रश्नच उद्भवत नसल्याने यंदाचे रबीचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. गव्हाचा पेरा यंदा कमी पावसामुळे घटणार आहे. परतीच्या पावासाने दिलासा दिल्याने तरी शाळू ज्वारीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून आले. यंदा हरभराही जास्त लावणार नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.
यापुढे कर्जमाफी मिळणे अशक्य...
अनेक राजकीय पक्षांकडून शेतक-यांच्या भावनिक मुद्याला हात घालून सरकट कर्जमाफीची घोषणा करत आहेत. परंतु बँक अधिका-यांच्या म्हणण्यानुसार आता कर्जमाफी देतांना बँकाकडून त्याला कडक विरोध होईल या कर्जमाफीच्या घोषणेने बँकांचा एपीए मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
दुष्काळ तसेच वेगवेगळ्या आस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल होत आहे. असे असले तरी, आता भविष्यात कुठलेही सरकार आले तरी असा निर्णय घेताना त्यांना आर्थिक ताळेबंदाचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.