पेट्रालचे दर : तीन रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:17+5:302021-02-05T07:58:17+5:30

सरकारचे नियंत्रण सुटले पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर सरकारचे नियंत्रण होते. मध्यंतरी हे सर्व नियंत्रण सरकारने हटवून ते तेल उत्पादक ...

Petrol rates: From Rs 3 to Rs 100 | पेट्रालचे दर : तीन रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतचा भडका

पेट्रालचे दर : तीन रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंतचा भडका

googlenewsNext

सरकारचे नियंत्रण सुटले

पूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर सरकारचे नियंत्रण होते. मध्यंतरी हे सर्व नियंत्रण सरकारने हटवून ते तेल उत्पादक कंपन्यांच्या हातात दिले. त्यामुळे या कंपन्या आपला नफा कसा वाढेल यावर भर देणार आहेत. त्यामुळे भविष्यात हे दर कमी होतील, अशी आशा करणे हे वेडेपणाचे ठरेल.

अशोक हुरगट

-----------------------------------------

कायद्याचा बडगा गरजेचा

आज भाव वाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे कंपन्या आपली मनमानी करतात. या सर्व तेल उत्पादक कंपन्यांवर कायद्याचा एक प्रकारे अंकुश असणे गरजेचे आहे. आज कितीही दर वाढले, तरी वाहन ही एक अत्यावश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे सरकार भावाढीवर कायद्याने बंधन घालणार नाही, तोपर्यंत या तेल कंपन्या आपले धोरण बदलणार नाहीत.

ॲड. एस. एम. धन्नावत

--------------------------

वाहनांचे उत्पादन कमी करावे

पूर्वी आजच्या एवढी वाहने नव्हती. आज ही संख्या वेगाने वाढत आहे. यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत केल्यास त्याचा मोठा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या मागणीवर होऊ शकतो. पूर्वी जालन्यात सिटीबस होत्या. त्यामुळे रिक्षांना एवढी मागणी नव्हती. परंतु आता नीवन जालना तसेच जुना जालना भागात जाण्यासाठी सामान्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. याचा विचार होणे गरजेचे आहे.

प्रकाश लड्डा

--------------------------------------------------------

वाहनांचा कमी वापर व्हावा

आज आपण कुठेही जायचे म्हटले की, कार अथवा दुचाकी वापरतो. परंतु पूर्वी आपण साधारणपणे चार ते पाच किलोमीटर चालत जात होतो. परंतु आता आपण घरापासून जवळ जरी जायचे म्हटले तरी गाडीवरून जात आहोत. ही सवय बदलणे गरजेचे आहे. यातून पर्यावरण रक्षण होऊन तेलाची मागणी आपोआप कमी होऊन भाव कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच खिशालाही कमी झळ बसू शकते.

गोपाल अग्रवाल

---------------

सामान्यांना मोठा फटका

पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती या गेल्या दशकात झपाट्याने वाढल्या आहेत. याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून जे कच्चे तेल मिळते ते महाग मिळत आहे. त्यावर प्रक्रिया करून नंतर ते ग्राहकांना दिले जाते. त्यामुळे याचा मोठा फटका सामान्य माणसाला बसत आहे. महागाईत दिवसेंदिवस वाढ होणे ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.

विमल सिघवी

----------------------------

तीन रुपयांपासून दर पाहिले

आज कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. परंतु चाळीस वर्षांपूर्वी मी स्वत: तीन रुपये प्रतिलीटरने लुनात पेट्रोल टाकले आहे. आज हेच दर चक्क शंभरच्या घरात पोहोचल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारने ही बाब गंभीरतेने घेऊन हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

लक्ष्मीकांत कंकाळ

----------------------------------

सायकलचा वापर वाढवावा

पूर्वी जवळपास सर्वांकडेच सायकल होती. त्यामुळे पेट्रोल, डिझेलशी सामान्य माणसांचा संबंध नव्हता, परंतु जसे औद्योगिकीकरण वाढले. त्यानुसार वाहनांची संख्या आपोआपच वाढली आहे. त्याची आता आपल्या सर्वांना सवय लागली आहे. ती बदलून सायकलचा वापर वाढला पाहिजे. सायकल चालविणे हे आरोग्यासाठीदेखील एक उत्तम औषध आहे.

अनुप साहनी

----------------

रिफायनरी वाढवाव्यात

आज कच्चे तेल मोठ्या प्रमाणावर आपण आयात करतो. परंतु त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या खूप कमी आहेत. त्यामुळे सरकारने पेट्रोल तसेच डिझेलचे उत्पादन करून ते विक्री करण्यासाठी सहज उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून आज असलेल्या कंपन्यांच्या मक्तेदारीला आळा बसेल.

मिठ्ठालाल सकलेचा

-------------------------------

महागाई वाढली

आज पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती वाढत आहेत, त्याचा परिणाम महागाई वाढीवर होत आहे. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक महागली आहे. तुलनेने रेल्वे वाहतूक आणखी वाढविणे गरजेच आहे. परंतु ते सध्या शक्य नसल्याने किमान सर्वत्र दुहेरी रेल्वे मार्ग केल्यास त्याचा प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी चांगला उपयोग होईल. यामुळे वस्तुंच्या किमती नियंत्रणात राहतील.

डॉ. श्याम साकळगावकर

-------------------------------------------------

पर्यायी इंधन गरजेचे

आपण केवळ पेट्रोल आणि डिझेलवरच अवलंबून आहोत. ही बाब आता दूर सारावी लागेल. सीएनजी तसेच इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या वाहनांची आता गरज आहे. अनेक कंपन्या यावर काम करत आहेत. यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन देऊ केले आहे. तसेच इथेनॉलचा वापर करून पेट्रोल तसेच डिझेलला पर्याय शोधला पाहिजे.

महेंद्रकुमार भक्कड

---------------------------------

---------------

--------------------------------

Web Title: Petrol rates: From Rs 3 to Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.