जालना : तालुक्यातील बठाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी १४ विद्यार्थ्यांनी एरंडीच्या बिया खाल्ल्याने त्यांना वांत्या व जुलाबाचा त्रास सुरु झाला.प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जालना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात १२ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे. उपचारानंतर या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक मधुकर राठोड यांनी सांगितले.
जालना तालुक्यातील बठाण बुद्रुक येथे जिल्हा परिषद शिक्षण घेणा-या या विद्यार्थ्यांनी दुपारी परिसरात असलेल्या एरंडीच्या झाडावरील बिया खाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना वांत्या आणि जुलाब होऊ लागले. शाळेतील शिक्षक आणि परिसरातील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकीत्सक मधुकर राठोड यांनी तात्त्काळ उपचार सुरु केले. काही वेळानंतर या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारली. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिका-यांना मुलांवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
चैतन्य गणेश देवडे (८), पृथ्वीराज वसंत बांदल (८), भक्ती सोपान देवडे (९), गोपाल परमेश्वर देवडे (८), ओंकार प्रधान देवडे (८), प्रतिक रामनाथ देवडे (८), कृष्णा विष्णू बागल (९), दीपक भरत बागल (९), अनिकेत अर्जुन बागल (९), भारती राजेंद्र सिरसाठ (९), प्रशांत राजेंद्र शिरसाठ (६), ओमप्रकाश ऋषिधर पाटेकर (८), ओंकार दत्तात्रय वीर (८), जीवन जनार्दन उजाड (९)अशी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.