गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा अॅक्शन प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:27 AM2018-12-26T00:27:18+5:302018-12-26T00:27:23+5:30
निवडणूकीच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. या काळात जिल्ह्यात शांतता राहावी, यासाठी पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निवडणूकीच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. या काळात जिल्ह्यात शांतता राहावी, यासाठी पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला असून, विविध गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची माहिती पोलीस प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर गुन्ह्यानुसार त्या गुन्हेगारांवर मोक्का, एनपीडीए व जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सांगितले.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विविध कारवायाही केल्या जात आहेत. दिवसेंदिवस गुन्हेगारीत होणारी वाढ लक्षात घेता तसेच आगामी काही महिन्यांमध्ये निवडणुकांचा काळ सुरु होणार आहे. या काळामध्ये गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींबाबतची माहिती गोळा करण्याचे आदेश एसपी. एस. चैतन्य यांनी पोनि. गौर यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय अहवाल मागविण्यात येत आहे. त्यानंतर हा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, ज्या गुन्हेगारांवर अधिक गुन्हे दाखल आहे. त्यांच्यावर हद्दपारी, मोक्का, एनपीडीएची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
सध्या गुन्हेगारांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या गुन्हेगारांवर सर्वाधिक गुन्हे असतील त्या गुन्हेगारांवर मोक्का, एनपीडीए व हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे.
- एस. चैतन्य,
पोलीस अधीक्षक