जालना शहरातील पोलीस चौक्या कुलूपबंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:29 AM2019-02-11T00:29:39+5:302019-02-11T00:29:45+5:30
लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विविध भागांमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहे. परंतु लोकमतने रविवारी शहरातील सर्वच चौक्यांची पाहणी केली असता, या चौक्यांमध्ये एकही कर्मचारी दिसला नाही तर काही चौक्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शहरातील नागरिकांना काही तक्रार द्यायची असेल तर पोलीस ठाणे दूर पडते. यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाण्यांतर्गत शहरात सात चौक्या उभारण्यात आल्या. यात बडीसडक, काद्राबाद, मंमादेवी, बाजार पोलीस चौकी, नूतन वसाहत, जवाहर नगर, भोकरदन नाका या ठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या. परंतु, चौक्यांमध्ये पोलीस कर्मचारी थांबत नसल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.
बडीसडक येथील पोलीस चौकीची पाहणी केली असता, तेथील चौकीला कुलूप दिसले. नागरिकांना विचारले असता, या चौकीत पोलीस थांबत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तेथूनच जवळ असलेली काद्राबाद पोलीस चौकीही बंद दिसली. चौकीची इमारत सुज्ज आहे. परंतु येथे कोणीच दिसले नाही.
मात्र, मंमादेवी चौकातील पोलीस चौकीत कर्मचारी दिसले. नूतन वसाहत परिसरातील पोलीस चौकीची तर दुरवस्था पाहायला मिळाली. चौकीसमोरच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत.
चौकीला दरवाज्या नसल्याने चॅनल गेटला कुलूप दिसले. शहरातील सर्वच चौक्यांवर लाखों रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, एकाही चौकीत कर्मचारी नसल्याने चौक्या फक्त शोभेची ठिकाणे बनल्या आहेत.
याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
घाणीचे साम्राज्य
चौक्यांची पाहणी केली असता, बडी सडक, काद्राबाद या चौक्यांचा परिसर स्वच्छ दिसला. परंतु मंमादेवी चौकी, नूतन वसाहत येथील चौकी समोरच घाणीचे साम्राज्य दिसले. या चौकीच्या भिंतीही पडलेल्या आहे. तसेच खिड्यांची काचे, कचऱ्याचे ढीगही येथे आढळून आले.
बाजार चौकातील पोलीस चौकी तर नेहमीच बंद राहत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या परिसरात नेहमीच गर्दी असते. येथे पोलीस कर्मचारी ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज
लाखो रुपये खर्च करुन शहरातील विविध भागांमध्ये चौक्या तयार करण्यात आल्या. परंतु, याकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे दुर्लक्ष असते. याकडे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी लक्ष देण्याची गरज आहे.