लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गुटखा बंदी असताना शहर व जिल्ह्यात सर्रासपणे अनेक पानटपऱ्यांवर गुटखा मिळत आहे. गुटख्याचा अवैध मार्गाने साठा करून ठेवणा-या चार ठिकाणी शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या विशेष पथकातील सदस्य आणि त्या-त्या पोलीस ठाण्याच्या चार पथकाने सायंकाळी छापे घालत लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार व त्यांच्या पथकाने खब-यांमार्फत शहरातील गुटखा साठवणूकीची माहिती जाणून घेत, शनिवारी सायंकाळी सदर बाजार आणि कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन ठिकाणी तर चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामावर छापा टाकला. या छाप्यामध्ये लाखो रूपयांचा गुटखा आढळून आला. ज्याची अंदाजित किंमत पन्नास लाखांपेक्षा अधिक असू शकते. याप्रकरणात संयशीत आरोपी म्हणून इलियास, राजू बेलोरे, सुनील बायस, राजेंद्र खंदे, मयन ठक्कर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा साठा सतिष जैस्वाल ऊर्फ लाला याचा असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या कारवाईची माहिती पोलीस प्रशासनाने अन्न व औषध प्रशसनााला कळविली असून, जप्त गुटख्यांचा पंचनामा आणि त्याची निश्चित किंमत अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाºयांकडून मिळणार आहे.या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुटखा नेमका कोणत्या राज्यातून आणला जातो याची पाळेमुळे आता पोलीस शोधणार आहेत. एकूणच गुटखा बंदी असताना गुटखा कोठून येतो याचा शोध घेण्याचे आवाहन पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनासमोर आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गुटखा गोदामावर पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:44 AM