पूर्णा, केळणा नदीपात्रात उरले बंधाऱ्याचे सांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:37 AM2019-11-04T00:37:57+5:302019-11-04T00:38:09+5:30
पूर्णा, केळणा नदीला आलेल्या पुरात तब्बल १२ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, नद्या, नाल्या दुथडी वाहू लागल्या आहेत. पूर्णा, केळणा नदीला आलेल्या पुरात तब्बल १२ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले. या बंधाऱ्यांचे केवळ सांगडे नदीपात्रात उभा आहेत. तर महापुरामुळे नद्यांनी प्रवाह बदलल्याने ५० हून अधिक शेतक-यांची शेतजमीन वाहून गेली आहे.
भोकरदन तालुक्यात २७ आॅक्टोबर व १ नोव्हेबर रोजी परतीच्या पावसामुळे पूर्णा, गिरजा, केळणा, जुई, धामणा, रायघोळ या नद्यांना अनेक वर्षानंतर महापूर आला होता. पाण्याच्या प्रवाहात पूर्णा नदीवरील तांडा बजार, तांदुळवाडी, जैनपुर कठोरा, सिरसगाव मंडप, नांजा, बेलोरा, केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-यांच्या दोन्ही बाजुचा भराव वाहून गेला. त्याच प्रमाणे केळना नदीवरील भोकरदन, गोकुुळ, आलापूर, आरतखेडा, वरखेडा विरो, जुई नदीवरील निंबोळा, व रायघोळ नदीवरील शेलूद व पारध येथील बंधाºयांचा भरावही पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणीसाठा होणार नाही. या भागातील नद्यांनी पात्राच बदलल्याने लगतच्या शेतक-यांच्या जमिनी पिकासह वाहून गेल्या आहेत. नदीच्या काठावरील विहिरी गायब झाल्या असून, ५० पेक्षा जास्त शेक-यांना मोठा फटका बसला आहे. केळना नदीवरील आलापूर येथील बंधारा वाहून गेल्यामुळे येथील शेतकरी राहुल चौधरी यांची एका बाजुची शेती वाहून गेली आहे. शिवाय विहीर ढासळली आहे.
पाणीसाठा व्हावा म्हणून लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या वतीने तालुक्यातील कोल्हापुरी बंधा-यांना गेट बसविण्यात आले होते. मात्र, सतत अपुºया प्रमाणात पडणारा पाऊस यंदा धो-धो बरसला आणि पुरात कोल्हापुरी बंधा-याची वाताहत झाली.
तालुक्यात सिंचनक्षेत्र वाढीसाठी गत पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बंधा-याची कामे करण्यात आली होती. त्यापैकी कोल्हापुरी बंधा-याची वाताहात झाली. मात्र सिमेंट बंधारे तग धरून आहेत. केवळ शेलूद व पारध येथील बंधारा वाहून गेला आहे़