लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने धाडी मारल्या. ही कारवाई शनिवारी करण्यात आली असून, खताच्या तपासणीत दगडाचे खडे आढळून आले आहेत.धाकलगाव येथील कृषी सेवा केंद्रातून परिसरातील शेतकऱ्यांना जैविक खतांची विक्री करण्यात आली होती. त्यात मोठमोठाले दगडाचे खडे आढळून आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी तयप्पा गरांडे, अंबड पं. स. तालुका कृषी अधिकारी जे. डी. वाघमारे, कृषी सहाय्यिका एस. सी. पाटील, वाय. के. कुलकर्णी आदींच्या पथकाने शनिवारी धाकलगाव येथील गुरुदत्त कृषी सेवा केंद्र तसेच सतीश वायसे यांचे दुकान आणि गोडाऊनची तपासणी केली. ज्या कंपनीचे खते, औषधी विक्री सुरु होती. कंपनीचे ही खरेदी-विक्री बिलेच गायब असल्याचे निदर्शनास आले.सतीश वायसे यांच्या दुकानावर तर खते व बी बियाणे व औषध विक्रीचा परवाना आढळून आला नाही. विना परवाना चालणाºया या दुकानावर नाम फलक ही आढळला नाही. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी अंबड येथील जगदंबा ग्रो ट्रेडर्स या दुकानाची ही तपासणी केली. या ठिकाणी परवान्यामध्ये समाविष्ट नसलेल्या औषधांचा साठा आढळून आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दोन्ही दुकाना सील करुन खत, औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणी अहवाल प्राप्त होताच दोन्ही दुकानदारांवर पुढील कायदेशीर कारवाई हाती घेणार असल्याचे पं.स. कृषी अधिकारी जे. डी. वाघमारे यांनी यावेळी सांगितले.दुकानाला कुलूपपथक येणार असल्याची माहिती मिळताच दुकानदारांनी दुकानाला कुलूप लावले. शुक्रवारीही दुकाने बंद होती. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी स्वत: शनिवारी या पथकासोबत कारवाई केली. दुकानाचे कुलूप तोडून पाहणी करण्यात आली.
धाकलगावात कृषी सेवा केंद्रावर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:49 PM