नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जालन्यात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:38 AM2019-12-24T00:38:18+5:302019-12-24T00:38:53+5:30
नवीन नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित एनआरसी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी जालन्यात समस्त नागरिक संघटनेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जालना : नवीन नागरिकत्व कायदा आणि प्रस्तावित एनआरसी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी जालन्यात समस्त नागरिक संघटनेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवाची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी हिंदू-मुस्लिम, सीख-ईससाई हम सब है भाई...च्या घोषणा देण्यात येत होत्या. तसेच पंतप्रधान मोदी-गृहमंत्री अमित शहांची दादागिरी नही चलेगी..नही..चलेगी या घोषणांनी शहर दुमदुमले. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात ही रॅली काढण्यात आली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मस्तगड येथून या रॅलीला सुरूवात भारतरत्न डॉ. बासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या रॅलीत युवकांचाही मोठा सहभाग दिसून आला. इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणाही यावेळी देण्यात येत होत्या. ज्या भागातून ही रॅली जात होती, त्या भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती. बंदोबस्तासाठी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील रॅलीसोबत पायी जातांना दिसून आले. या रॅलीचा समारोप दुपारी इद्गाह मैदावर सभेने करण्यात आला.
यावेळी मौलाना सोहेल यांनी सांगितले की, नागरिकत्व कायद्याची देशाला गरज कशी पडली याचा खुलासा केंद्र सरकारकडून केला जात नाही. आम्ही तसेच आमचे पूर्वज हे भारतातच जन्मले आहेत. असे असतांना पुन्हा पुरावे देण्याची गरज काय असा सवाल त्यांनी केला. तसेच हे दोन्ही कायदे राज्य घटनेला धरून नसल्याची टिका त्यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केंद्र सरकावर हल्ला चढविला. ते म्हणाले की, देशात मंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. तसेच अनेक उद्योग बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे. हे महत्वाचे मुद्दे सामान्यांच्या लक्षात येऊ नयेत आणि यातून आपल्या सरकारविरूध्द असंतोष होऊ नये म्हणून असे नवनवीन चुकीचे कायदे करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी घाई केली जात आहे.
ही बाब चुकीची असून, आता जनता पूर्वीप्रमाणे अंधविश्वासू राहिलेली नाही. त्यामुळे सरकारचे इरादे आम्ही सर्व मिळून फोल ठरवू असे ते म्हणाले. राज्य घटनेतील तरतूदींना यामुळे एक प्रकारे नख लावण्याचेच काम केले जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी कामगार नेते अण्णा सावंत यांनी देखील उद्योगातील मंदीचे दाखले देत कामगारांवर कसे संकट आले आहे, याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार चुकीचे मुद्दे उपस्थित करून दिशाभूल करत असल्याचे सांगितले. इक्बाल पाशा यांनी देखील या कायद्याला विरोध करताना सरकार दडपशाही करून सामान्य जनेतेवर आपले विचार थोपत असल्याचे सांगितले.
यावेळी अब्दुल हाफीज, साईनाथ चिन्नादोरे, राजेंद्र राख यांनीही सरकारच्या धोरणावर जोरदार प्रहार केला.
यावेळी शेख महेमूद, अयुबखान, शेख अक्तर, हाफीज जुबेर, बदर चाऊस, अॅड. अमजद, मिर्झा अन्वर बेग, अॅड. अश्फाक, इसा कश्वी, डॉ. रियाज, डॉ. संजय राख, काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत, शरद देशमुख, फारूक तोंडीवाला, अकबर खान बनेखान, सैय्यद रहीम, नबाब डांगे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन मुक्ती फईम यांनी केले. सभेनंतर जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांना निवेदन देण्यात आले.