- संजय देशमुख
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा विजय तेव्हाच निश्चित मानला गेला, ज्यावेळी काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी यावरून खल सुरू होता. कोणीच नेता दानवेंच्या विरोधात दोन हात करण्यास तयार नव्हता. ऐनवेळी २०१४ मध्ये पराभव पत्काराव्या लागणाऱ्या विलास औताडेंच्या गळ्यात उमेदवारी मारण्यात आली. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून दानवेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यात अपयशी ठरले. दानवेंचा विजय एवढ्या मोठ्या मताधिक्याने झाल्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. वाटेतील सर्व अडथळे खुबीने दूर करून दानवे विजयी रथावर सलग पाचव्यांदा स्वार झाले.
जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला स्व. खा. बाळासाहेब पवार यांच्यानंतर खमक्या नेताच मिळाला नाही. एकवेळेस स्व. अंकुशराव टोपे यांनी विजय मिळवून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि टोपे पिता-पुत्र राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यात शकले उडाली. धडाडीचा एकही नेता त्यांच्याकडे शिल्लक नसल्याने आज काँग्रेस गर्भगळीत झाली आहे. माजी आ. कैलास गोरंट्याल हे अल्पसंख्याक समाजाचे असतानाही ते त्यांच्या बळावर जालन्यात काँग्रेसला जिवंत ठेवत आहेत. एकूणच भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे प्रस्थ वाढल्याने आणि त्यांनी गेल्या पाच वर्षांत विकास कामे आणि संघटनात्मकबांधणी केली. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळाले. दानवेंच्या पराभवासाठी केंद्र आणि राज्यातील शेतकरी विरोधी धोरण तसेच दानवेंचे शेतकरी विरोधी वक्तव्य हे त्यांना मारक ठरतील, असे वाटले होते. परंतु नागरिकांना पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा मोदीच हवे होते, त्याचा परिणामही दानवेंचे मताधिक्य वाढण्यावर झाला. लोकसभेत युतीला मिळालेल्या यशामुळे आता पाच महिन्यांनी येणाऱ्या विधासभेतही हेच चित्र राहते की, त्यात बदल होतो, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.
खोतकरांचे बंड थोपविण्यात यशमध्यतरी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे मनसुभे बांधले होते. परंतु दानवे यांनी खोतकरांचे बंड थोपविण्याचे काम थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सोपवले होते. ती त्यांनी यशस्वी केली.
स्कोअर बोर्डखा. रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९८ हजार ४९ अशी घसघशीत मते मिळवीत सलग पाचवा विजय नोंदविला. त्यांनी गेल्यावेळच्या निवडणक ीत दोन लाख ६ हजारांचे मताधिक्य घेतले होते. यंदा ते वाढून ३ लाख ३२ हजार ८१५ इतके झाले. काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ३ लाख ६५ हजार १२४ मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे ७७ हजार १५८ मते मिळवीत तिसऱ्या स्थानावर राहिले.