कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी- संगीता गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:03 AM2019-05-20T00:03:52+5:302019-05-20T00:04:42+5:30

रविवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत जलवाहिनीच्या चौकशीसाठी आम्ही तयार असून, एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊद्या असे दानवेंना थेट आव्हान दिले.

Ready to face any inquiry- Sangeeta Gorantyal | कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी- संगीता गोरंट्याल

कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी- संगीता गोरंट्याल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहराचा पाणीप्रश्न सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. शनिवारी खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी थेट जालना पालिकेवर आरोप करून नियोजनाअभावी जालनेकरांवर पाणीसंकट आल्याचे नमूद करत अंतर्गत जलवाहिनीच्या कामाची चौकशी प्रस्तावित केली आहे. त्यांच्या या आरोपाचे खंडण करण्यासाठी रविवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत जलवाहिनीच्या चौकशीसाठी आम्ही तयार असून, एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊद्या असे दानवेंना थेट आव्हान दिले.
जालना शहरात गेल्या तीन महिन्यापासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. यासाठी अंबड नगर पालिकाही तेवढीच जबाबदार असून, पैठण ते जालना या मार्गावर अनेक शेतकरी आणि पाणी माफिया हे व्हॉल्वह फोडून लाखो लीटर पाणी चोरी करत आहेत. त्यामुळे किमान ५ ते ६ एमएलडी पाणी जालन्यापर्यंत कमी येत आहे. या महत्वाच्या मुद्दयावर खासदार, सत्ताधारी पक्षातील मंत्री यांनी लक्ष देणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी यावर चुप्पी साधली. तसेच अंबडला पाणी देण्याचा निर्णय हा तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, त्यात तथ्य नसून, २०१६ मध्ये आ. नारायण कुचे यांनी यासाठी प्रयत्न करून, अंबडला पाणी सोडवून घेतले. परंतु, हे करत असतांनाच अंबड नगर पालिका त्यांच्या ताब्यात असतांना नियमानुसार जालना पालिकेला जो आर्थिक हिस्सा अंबड पालिकेने देणे अपेक्षित होते. तो न दिल्यानेही जालन्याला कमी पाणीपुरवठा होत असल्याचे संगीता गोरंट्याल यांनी नमूद केले.
जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी करीता १३६ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यातून आतापर्यंत जवळपास ४०० किलोमीटरची पाईपलाईन अंथरण्यात आली आहे. जलकुंभ उभारणीचे काम मात्र, तांत्रिक कारणामुळे मागे पडल्याचे यावेळी मान्य करण्यात आले. परंतु, ते कामही गतीने हाती घेतले जाईल असे गोरंट्याल म्हणाल्य. यासाठी सेंट्रल जेलपासुन पोलीस कर्मचारी वसाहत, शासकीय विश्रामगृह, बीज शितल सीड्स येथून जुन्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही जलवाहिनी रेल्वे रूळाखालून जाणार असल्याने त्यासाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. त्या परवानगीसाठी खा.दानवे यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते. परंतु, त्याचा पाठपुरावा देखील जालना पालिकेनेच केला. डक खालून पाईपलाईन अंथरण्यासाठी हैदराबाद रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी परवानगी दिली आहे. परंतु, त्यासाठी चार लाख रूपये हे रेल्वे प्रशासनाकडे भरावे लागणार आहेत. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, शाह आलम खान, गणेश राऊत, भुरेवाल, शेख महेमूद, महावीर ढक्का, रमेश गौरक्षक आदींची उपस्थिती होती.
कैलास गोरंट्याल : थर्ड पार्टी आॅडिट होणार, आरोपात तथ्य नाही
आज अंतर्गत जलवाहिनीचे काम वेगाने सुरू आहे. हे काम करत असतांना ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या पाळल्या आहेत की नाही याची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून केली जाते. त्यानंतरच झालेले काम योग्य आहे की नाही यावर शिक्कामोर्तब होतो.
त्यामुळे खासदार रावसाहेब दानवे यांच्या आरोपात तथ्य नाही. थर्ड पार्टी आॅडीट होणार असल्याने त्यातुनच ही योजना दर्जेदार झाली आहे की नाही हे समोर यईल. असे प्रतिपादन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
आरोप बिनबुडाचा : एकूणच जालना शहरातील पाईपलाईन टाकताना ४० टक्के निकष डावलण्यात आल्याचा आरोपही बिनबुडाचा असून, त्यासाठी टेंडरमध्येच २५ टक्के बदल करण्याचे अधिकार आम्हाला आहेत. त्यातच बाहुबली नगरसेवकांकडून आपआपल्या भागात ही जलवाहिनी वळविण्यात आल्याचा आरोप दानवेंनी केला. मात्र, हे बदल नेमके कोणी आणि कुठे केले आहे. याचे वास्तव आपण २४ मे नंतर माध्यमांना प्रत्यक्ष घटनास्थळावर नेऊन दाखवू असा दावाही यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केला.
आढावा बैठकीत का डावलले : जालना शहराला ६० टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खा. दानवे यांनी जो प्रयत्न केला आहे. तो केविलवाणा असून, त्यांच्या सारख्या उच्च पदस्थ नेत्याला हे न शोभणारे असल्याचे गोरंट्याल म्हणाले. हे टँकर इंदेवाडी येथील जलकुंभातून भरण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आहे तो पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. पाणीटंचाई आढावा बैठकांना नगराध्यक्षांना का डावलले जाते ? असा प्रश्नही यावेळी कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला.

Web Title: Ready to face any inquiry- Sangeeta Gorantyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.