एचआयव्ही बाधित १५ मातांच्या बाळांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:51 AM2019-08-05T00:51:20+5:302019-08-05T00:51:43+5:30
मागील दोन वर्षात जिल्ह्यातील १८ एचआयव्ही बाधित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. यातील १५ बालकांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
विकास व्होरकटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मागील दोन वर्षात जिल्ह्यातील १८ एचआयव्ही बाधित महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. यातील १५ बालकांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. तर तीन बालकांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. आरोग्य विभागाच्या वतीने महिलांवर नियमितपणे केलेल्या उपचारामुळे बालकांना एचआयव्हीची लागण झालेली नाही.
जिल्ह्यात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. एचआयव्ही बाधितांना सर्वसामान्य नागरिकासारखे जीवन जगता यावे, मातृत्व- दातृत्वाचा लाभ घेता यावा, त्यांच्याकडून जन्माला आलेल्या पाल्यांना एचआयव्हीची लागण होवू नये, यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना यश प्राप्त होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. येथील शासकीय रूग्णालयात एप्रिल २०१७ ते जून २०१९ पर्यंत शेकडो गर्भधारणा झालेल्या महिलांची तपासणी करण्यात आली. यात १९ महिला एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले. या महिलांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून विश्वासात घेवून त्यांच्यावर नियमित औषधोपचार करण्यात आले. यातील १८ महिलांची जून २०१९ पर्यंत शासकीय रूग्णालयात प्रसुती झाली. संबंधित महिलांच्या १५ बाळाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर तीन बालकांचा अहवाल प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.
एचआयव्ही ग्रस्त महिलेच्या प्रसुतीच्या ७२ तासानंतर नेव्हीरेपीन सिरप दिली जाते. त्यानंतर सहा आठवडे, बारा आठवडे, सहा महिने, बारा महिने व अठरा महिने यानुसार बालकांची तपासणी केली जाते. शेवटच्या तपासणीत बाळकाचा पॉझेटिव्ह व निगेटिव्ह अहवाल प्राप्त होतो.
समाजात आमची एचआयव्हीग्रस्त म्हणून ओळख आहे. परंतु, आमच्या पाल्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे.
हा आनंद गगनात न मावणारा असल्याच्या भावना एचआयव्हीग्रस्त मातांनी व्यक्त केल्या.