भोकरदन ते राजूर रस्त्याचे भाग्य उजाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:30 AM2021-04-25T04:30:16+5:302021-04-25T04:30:16+5:30
भोकरदन : तालुक्यातील भोकरदन ते राजूर या अत्यंत महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३९ कोटी रुपयांचा ...
भोकरदन : तालुक्यातील भोकरदन ते राजूर या अत्यंत महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार संतोष दानवे यांनी दिली आहे.
श्रीक्षेत्र राजुरेश्वरामुळे हा रस्ता भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात जालना येथे ड्रायपोर्ट सुरू झाल्यानंतर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहील. तसेच मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. नागरिकांनी या रस्त्याचे काम करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला होता. अखेर भोकरदन ते राजूर या रस्त्याच्या कामासाठी ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य उजाळणार आहे.