लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी/ शहागड : कोरोना आजार होणार नाही, सर्दी, खोकला होणार नाही, असा दावा करीत बालकांना लसरूपी द्रव पाजल्याप्रकरणी तीन महिलांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे सोमवारी दुपारी समोर आला.राधा रामनाथ सामसे (रा. साक्षाळ पिंप्री), सीमा कृष्णा आंधळे (रा. रुईपिंपळा ता. वडवणी), संगीता राजेंद्र आव्हाड (रा. डोईफोडवाडी, ता. जि.बीड) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. तीन महिला साष्ट पिंपळगाव व परिसरातील गावांमध्ये कोरोना आजार होत नाही, सर्दी-खोकला होत नाही, असे सांगून बालकांना लस देत होत्या. यासाठी ५० ते ६० रूपये त्या घेत होत्या. महिलांचा संशय आल्यानंतर साष्ट पिंपळगाव येथील नागरिकांनी शहागड प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली. यावरून डॉ. महादेव मुंडे, एनएनएम अर्चना पारखे यांनी सोमवारी साष्ट पिंपळगाव येथे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने महिलांना ताब्यात घेऊन पाहणी केली असता बनावट ओळखपत्र बनवून बालकांना लस देत त्यांची नावे रजिस्टरवर लिहित असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून सुवर्णप्राश नावाची बाटली व द्रव पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी वरील तिघींविरूध्द डॉ. महादेव मुंडे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डॉ. मुंडे यांच्या तक्रारीवरून वरील तिन्ही महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि हनुमंत वारे हे करीत आहेत.अटक केलेल्या महिलांना मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर प्रारंभी त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली. बुधवारी कोठडी संपल्यानंतर परत न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याचे सांगण्यात आले.
कोरोना लसीच्या नावाखाली लूट; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:17 AM