रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्य सेवाच ‘आजारी’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:38 AM2019-11-29T00:38:27+5:302019-11-29T00:38:48+5:30
गावस्तरावरील महत्त्वाचा घटक असलेल्या या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची (डॉक्टरांची) पदे रिक्त आहेत.
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील १४६ महसुली गावांसह वाड्या, तांड्यावरील अडीच लाखावर नागरिकांना आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आहे. मात्र, गावस्तरावरील महत्त्वाचा घटक असलेल्या या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची (डॉक्टरांची) पदे रिक्त आहेत. डॉक्टरांसह इतर जवळपास ३३ पदे रिक्त असून, रिक्त पदांमुळे जालना तालुक्यातील ग्रामीण भागाची आरोग्य सेवा कोलमडली आहे.
जालना तालुक्यात जवळपास १४६ महसुली गावे असून, वाड्या, तांड्यांची संख्या वेगळी आहे. अडीच लाखांवर नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सहा आरोग्य केंद्रांत प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाºयांची पदे मंजूर आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.
सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. तर एमपीडब्ल्यूची दोन, लिपिक एक, एएनएम एक, आरोग्य सेविकेचे एक व सेवकाचे एक अशी आठ पदे रिक्त आहेत. मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे एक, एमपीडब्ल्यूच्या तीन, एएनएम दोन, आरोग्य सेविकेचे एक, सेवकाचे एक अशी आठ पदे रिक्त आहेत. कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे एक, एएनएमची दोन व सेवकाचे एक पद रिक्त आहे. विरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे एक, एमपीडब्ल्यूची दोन, एएनएमचे एक, सेवकाची तीन पदे रिक्त आहेत. पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिकाचे एक, सेवकाची दोन पदे रिक्त आहेत. तर काळेगाव (दु.) प्राथमिक आरोग्य केंद्रातील एएनएमचे एक, एमपीडब्ल्यूचे एक व सेवकाचे एक असे एकूण सात पदे रिक्त आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांचा रूग्ण सेवेवर परिणाम होत आहे. विशेषत: सेवली येथे कायम वैद्यकीय अधिकारी नियुक्त नाही. प्रभारीवर कामकाज सुरू आहे. इतर ठिकाणी एकाच वैद्यकीय अधिका-याच्या खांद्यावर कामकाजाचा भार पडला आहे. त्यांनाच शासकीय बैठका, दौरे, आरोग्य उपक्रम राबवावे लागतात. त्यामुळे रूग्णांना सेवा देताना या अधिका-यांना कसरत करावी लागते. प्रसंगी इतर कर्मचा-यांकडूनच प्रथमोपचार घेऊन रूग्णांना घरी परतावे लागत आहे. अनेक रूग्ण थेट जालना येथील शासकीय किंवा खाजगी रूग्णालय गाठत आहेत. त्यामुळे रूग्णांसह नातेवाईकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.
तालुका आरोग्य अधिका-यांचे कार्यालय जिल्हा रूग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या एका धोकादायक इमारतीत सुरू आहे. याच इमारतीत आरोग्य विभागाची इतर कार्यालयेही आहेत.
मात्र, या इमारतीची अवस्था पाहता तातडीने या इमारतीतील सर्वच कार्यालये सुव्यवस्थेतील इमारतीत न्यावीत, अशी मागणी होत आहे.