दु:ख इथले संपले नाही...बॉण्ड व बकऱ्यांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:14 AM2019-05-01T01:14:48+5:302019-05-01T01:15:06+5:30
आत्महत्या होताच आनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी संतोषचे घर गाठून त्याच्या परिवाराचे सांत्वन केले. पण घटना होऊन आज ६ महिने झाले तरी संतोषच्या परिवाराला अद्याप एका पैशाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : कोरडवाहू ६ एकर जमीन. त्यात सहा लहान मुले, पत्नी व म्हातारी आई. सततची नापिकी व दुष्काळाने शेतात फारसे पिकत नव्हते. तरीही तो संसाराचा गाढा कसाबसा ओढत होता. मात्र, आता दिवसेंदिवस त्याचे देणेघेणे वाढतच चालले होते. लोकं वसुलीसाठी घरी चकरा मारू लागले. खोटं तरी किती दिवस बोलणार. अखेर १ नोव्हेंबर च्या रात्री त्याने सर्व कुटुंबीय झोपी गेल्यानंतर स्वत:च्या गळ्याभोवती फास आवळला. पत्नीसह आठ जणांचा त्याचा परिवार क्षणात उघड्यावर आला.
ही व्यथा आहे जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी संतोष सोनसाळे यांच्या कुटुंबाची. ३१ वर्षीय संतोषने आत्महत्या करुन स्वत:ला दु:खाच्या खाईतून मुक्त केले असले तरी, त्याच्या मागे राहिलेल्या परिवार जणांना त्याने कायमचे दु:खात लोटले आहे. आत्महत्या होताच आनेक अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी संतोषचे घर गाठून त्याच्या परिवाराचे सांत्वन केले. पण घटना होऊन आज ६ महिने झाले तरी संतोषच्या परिवाराला अद्याप एका पैशाचीही शासकीय मदत मिळालेली नाही.
आपले वडील महादू बकाल, दीर रामकिसन सोनसाळे आदींच्या मदतीने मयत संतोषची पत्नी संगीता आपल्या वृध्द सासूसह सहा लहान मुलांचा सांभाळ करीत आहेत. शेतवस्तीवर राहणा-या संगीताला स्वत:चे पक्के घरही नाही. कुडाच्या झोपडीत शासकीय मदतीची वाट पाहत हे कुटुंब सध्या दिवस काढत आहे. जे खाजगी देणे - घेणे होते, त्यांच्या वसुलीसाठी तगादे सुरू आहेत. तेवढे बँकेचे कर्ज तरी माफ झाल्याने मोठा आधार मिळाल्याचे संगीताने बोलून दाखविले. दुष्काळामुळे हाताला काम नाही. छोटया लेकरांना घरी सोडून कामालाही जाता येत नाही. आता कसे जगावे, हा प्रश्न आहे. त्यामुळे शासकीय मदतीकडे सर्व लक्ष आहे.
कळण्यापूर्वीच मुले अनाथ झाली
आॅन दी स्पॉट रिपोर्ट घेण्यासाठी शनिवारी मयत संतोष सोनसाळेच्या शेतवस्तीवर भेट दिली असता चार निरागस बालके खेळत होती. पहिल्या तीन मुली झाल्यानंतर संतोषच्या पत्नीने चौथ्यांंदा एकाच वेळी तिळ्यांना जन्म दिला होता. ब्रह्मा, विष्णू, महेश अशी नावे असलेली ही तिघे चिमुकली मुले वडील कळण्यापूर्वीच अनाथ झाली. मोठी मुलगी रुपाली ५ वीत आहे. सुट्या लागल्याने रूपाली व शीतल आजोळी गेल्या होत्या. ४ थी तील दीपाली आपल्या भावंडांना खेळवत होती. महादू बकाल हे लेकीसाठी घरून गहू- शाळू घेऊन नेमकेच आले होते. मदत म्हणून मिळालेल्या बक-यांवरच आता गुजराण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मयत संतोष सोनसाळेंच्या कुटुंबियांना खा. सुप्रिया सुळे यांनी चार बक-या देऊन मदत केली होती. आता या चार बक-यांना प्रत्येकी एक पिलू झाल्याने बक-या चारच्या आठ झाल्या आहेत. तर जि. प. सदस्य शालिकराम म्हस्के यांनी तिघी मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजार रुपये बँकेत ठेव करून बॉन्ड कुटुंबियांच्या सुपूर्द केले होते. मदतीच्या रुपात मिळालेल्या बक-या व बॉन्ड हाच काय तो आज संगीताबाईंचा जगण्याचा आधार आहे.