- पवन पवार जालना - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी सलाईन लावावे किंवा पाणी प्यावे यासाठी अंतरवाली सराटी येथील महिलांनी सोमवारी रात्री जवळपास दोन तास त्यांची विनवणी केली होती. महिला व समाज बांधवांनी केलेल्या विनंतीनुसार मनोज जरांगे यांनी मंगळवारी पहाटे १२:२० वाजण्याच्या सुमारास सलाईन लावून घेतले आहे.
तत्पूर्वी मनोज जरांगे म्हणाले, "आमचे कुणीही समितीमध्ये जाणार नाही. ना मी, ना आमच्यावतीने कुणी तज्ज्ञ अथवा महाराष्ट्रातील कुणी, आमच्या वतीने कुणीही जाणार नाही. सरकारनेच त्यांचे कुणी समितीत टाकायचे ते टाकावेत. आमच्या वतीने समितीत कुणीही जाणार नाही. तो मोहही आम्हाला नाही. आम्हाला एकच मोह आहे, तो म्हणजे, काहीही करा, पण मराठा समाजाला आणि त्या पोरांना आरक्षण द्या. एवढाच मोह आम्हाला आहे. समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही. त्यासंदर्भात आम्ही आमचे मत स्पष्ट केले आहे. त्यांनीच तज्ज्ञ टाकावेत आणि समाजाला न्याय द्यावा."
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "मी कुणालाही भीत नाही, मी केवळ माझ्या समाजाला भीतो. माझे गावकरी जे भावणिक झाले आहेत मी केवळ त्याला दबतोय. माझ्या माता माऊल्या सगळ्याच गेल्या दोन तासांपासून रडत आहेत, संपूर्ण गाव विनंती करत आहे की, किमान सलाईन तरी घ्या, थोडं पाणी तरी घ्या. ते थोडं माझ्या काळजाला लागतंय. ते माय-बाप आहेत म्हणल्यावर त्यांचे ऐकावे की नाही, या दुविधा मनःस्थितीत आहे. माझ्यात निर्णय घेण्याची क्षमताच राहिली नाही. ते रडले नसते, भावणिक झाले नसते, तर मी आणखीही ताठर राहिलो असतो. काय करावे, सुचत नाहीय. पण बघुया, त्यांच्याकडूनही येईलच ना कुणीतरी आम्हाला सांगायला की, कशासाठी वेळ हवा, का हवा, ते जबाबदारीने काम करणार आहेत का? आम्ही एक पाऊल मागे यायचं म्हणत आहेत, आम्ही दोन पावलं मागे येऊ. पण वेळ का आणि कशासाठी हवा हे आम्हाला कळायलाही हवे आणि तुम्ही खरोखरच करणार आहात का? हा महत्वाचा मुद्दा आहे."