लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संत रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठाच्या वतीने ७ ते ९ डिसेंबर दरम्यान समर्थ महासंगम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक सुरेश जोशी यांच्या हस्ते होणार आहे.या सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु:शताब्दी प्रबोधन समितीतर्फे सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील सर्व थोर संतांची गावे ही जागतिक प्रेरणास्थळे व्हावी या हेतूने प.पू. गोविंदगिरी स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये चैतना ज्ञानपीठाची स्थापना २०१२ मध्ये पुणे येथे करण्यात आली. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील संताची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या गावामध्ये विविध विकास योजनांसह विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महेश कवठे यांनी दिली. यावेळी जांबसमर्थ येथे होणाऱ्या सोहळ्यास राज्यासह देश आणि परदेशातून भाविकांची उपस्थिती राहील, असे सांगण्यात आले. दरम्यान उद्घाटन सोहळ्यास प.ूप. अद्रश्य काडसिध्देश्वर महाराज, ह.भ.प. निरंजन महाराज ठाकरे यांची उपस्थित राहणार आहे.रविवारी सकाळी काकड आरती तसेच परिसंवाद होणार असून यावेळी लखन जाधव हे शौर्य प्रात्यक्षिके सादर करणार असून परिसंवादात प्रकाश पाठक, दादासाहेब जाधव, अभिजीत देशमुख, मनीषा बाठे यांचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाचा समारोप सोमवारी होणार असून यावेळी ‘प्रपंच करावा नेटका’ याविषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी शरद कुबेर हे राहणार असून प्रमुख वक्ते अविनाश गोहाड, डॉ. विजय लाड, मंगला कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी १२ वाजता प.पू. गोविंदगिरी महाराजाचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.पत्रकार परिषदेस निवृत्त मुख्याध्यापक विनायक देशपांडे, प्रा. विनायक दसरे, चैतन्य ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कळमळकर, समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन समितीचे अध्यक्ष विनायक देहडकर, महेश कवठेकर, सूर्यकांत कुलकर्णी, रवींद्र भामरे आदींची उपस्थिती होती.जांब समर्थ येथील रविवारी दुपारी १२ वाजता संतपूजन कार्यक्रमात हेलिकॉप्टरव्दारे सायंकाळी ४ वाजता पुष्पवृष्टी होणार असून याच दिवशी ह.भ.प. पांडुरंग महाराज आनंदे यांचे कीर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन पत्र परिषदेत केले.
जांब समर्थ येथे समर्थ महासंगम सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 1:07 AM